• Sun. Sep 22nd, 2024

RTO निरीक्षकावर झाडली गोळी, उंदीर पायावरुन गेल्याच्या ‘नाट्या’चा पर्दाफाश, तपासात धक्कादायक खुलासा

RTO निरीक्षकावर झाडली गोळी, उंदीर पायावरुन गेल्याच्या ‘नाट्या’चा पर्दाफाश, तपासात धक्कादायक खुलासा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत भारत गायकवाड (रा. सेंट्रल बाजार रोड) यांच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. उंदीर पायावरून गेल्याने दचकल्यामुळे गोळी सुटल्याचे नाट्य रचण्यात आले होते, हे गुन्हेशाखा पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. या नवीन माहितीमुळे आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबार प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

७ मे २०२२ ला सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास संकेत गायकवाड हे कर्तव्यावर जाण्यासाठी गणवेश घालत होते. बेल्ट व होलस्टर (रिव्हॉल्व्हर ठेवण्याचे कव्हर) लावले. होलस्टरमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवताना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. त्यामुळे गायकवाड हे दचकले. रिव्हॉल्व्हर खाली पडून त्यातून बंदुकीतून गोळी सुटली. ती डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरीत पऊसली. त्यानंतर गायकवाड यांनी या घटनेची माहिती आरटीओचे अधिकारीद्वय गीता शेजवळ व वीरसेन ढवळे यांना दिली. दोघांनी गायकवाड यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती बजाजनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी याची नोंद घेतली. परंतु या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हेशाखेला सखोल चौकशीचे आदेश दिले. युनिट एकचे निरीक्षक सुहास चौधरी यांनी चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी गीता शेजवळ, ढवळे, गायकवाड यांच्या पत्नी कोमल व डॉ. सुधीर देशमुख यांचे बयाण नोंदविले.
पोराचा राग बापावर; प्रेमी युगुल पळाले पण शिक्षा घरच्यांना, जबर मारहाणीत गेला एकाचा जीव
सर्वांच्या बयाणात तफावत आढळली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता रिव्हॉल्व्हर खाली पडून नव्हे तर त्यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चौधरी यांनी बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. घटनेच्यावेळी गायकवाड हे घरी होते. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. अज्ञात त्यांच्या घरात कसा घुसेल, याचा उलगडा मात्र अद्यापही न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

घटना दडपण्यासाठी आरोपांचे सत्र

भारत गायकवाड यांच्यावरील गोळीबाराची घटना दडपण्यासह या प्रकरणात विभागीय चौकशी होऊ नये, याकरिता आरटीओतील एका अधिकाऱ्याविरुद्ध एकामागून एक आरोप करण्यात आले. या घटनेनंतर आरटीओतील एक महिला निरीक्षक, तिचा पती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आता प्राणघातक हल्ल्याचा गुन्ह्यानंतर आरटीओचे काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed