• Sun. Sep 22nd, 2024

फुलेंनी जे कार्य केलं ते मी शब्दात सांगू शकत नाही, ‘सत्यशोधक’ पाहिल्यावर चिमुकलीचे उद्गार

फुलेंनी जे कार्य केलं ते मी शब्दात सांगू शकत नाही, ‘सत्यशोधक’ पाहिल्यावर चिमुकलीचे उद्गार

बारामती : महापुरुषांचे कार्य केवळ पुस्तकातूनच न सांगता त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले तर विद्यार्थ्यांना प्रकर्षाने महापुरुषांचे कार्य समजेल. या हेतूने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(गिरमे वस्ती) विद्यार्थ्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या खडतर व क्रांतिकारी कार्याचा अनुभव घेतला.

अखंड स्त्री जातीला शिक्षणाची कवाडे खुली करणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या खडतर परिस्थितीत शाळा सुरू केल्या. यासाठी त्यांना कुटुंबांकडूनही रोष पत्करावा लागला. तत्कालीन कर्मठ विचारसरणीच्या समाज व्यवस्थेलाही त्यांना तोंड द्यावे लागले. अतिशय अनुकूल परिस्थिती असतानाही त्यांनी आपले शैक्षणिक कार्य सुरूच ठेवले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारी कार्यामुळे आज प्रत्येक भारतीय शिकू लागला आहे.

महापुरुषांचा इतिहास केवळ पुस्तकातून समजण्यापेक्षा त्यांना चित्रपटातून त्यांचा इतिहास व त्यांचे कार्य दाखवले तर ते विद्यार्थ्यांना लवकर समजेल. या हेतूने दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरमे वस्ती येथील शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील सुमारे १६० विद्यार्थ्यांना आज बारामतीतील चित्रपटगृहात महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’हा चित्रपट दाखविण्यात आला, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे जिल्हा सरचिटणीस विजय गिरमे यांनी दिली.

मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले आहे ते खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी जर हे कार्य केले नसते तर आज आपण शिकू शकलो नसतो. स्वतःला घडवू शकलो नसतो. हे मला सत्यशोधक चित्रपटातून अनुभवायला मिळाले. त्यांनी जे कार्य केले आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया राधिका राजेश भालके या चिमुकलीने चित्रपट पाहिल्यानंतर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed