• Sat. Sep 21st, 2024
तीन आठवड्यात नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार, पुणेकरांसाठी गुडन्यूज

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्याचे नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असुन त्याची पाहणी केल्यानंतर काही किरकोळ त्रुटी जाणवल्या आहेत. ती कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या दोन ते तीन आठवड्यात पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

हे नवे टर्मिनल महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे असून, पुण्याच्या लौकिकामध्ये भर पाडणारे आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सर्वांना प्रेरणा देणारा आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

पुणे विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलची शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या पाहणीत स्वच्छता व इतर काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना ही माहिती दिली.

शिंदे म्हणाले, की पुण्यासोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत. पुणे हे आयटी, शिक्षण, औद्योगिकरण क्षेत्रात खूप पुढे आहे. त्यामुळे पुण्याला हवाई वाहतूक क्षेत्रात पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. पुण्यासाठी ५२ हजार स्क्वेअर मीटर जागेत नवीन टर्मिनल उभारण्यात आले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आलो आहे.

त्यानंतर कोल्हापूर विमानतळाचे काम पूर्ण झाले असून त्याची पाहणी करणार आहे. जुन्या टर्मिनलपेक्षा दुप्पट क्षमतेचे हे टर्मिनल आहे. २०१४ मध्ये पुण्यातून फक्त १४ शहरांसाठी विमान सेवा सुरू होती. आता ती ३७ शहरांसोबत सुरू आहे. तसेच, दोन आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहेत, असं शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed