• Sat. Sep 21st, 2024

शिवीगाळ केल्याचा राग मनात, संधी मिळताच डाव साधला, कोर्टात साक्षीदारही फितून ठरले, अखेर आरोपीला शिक्षा

शिवीगाळ केल्याचा राग मनात, संधी मिळताच डाव साधला, कोर्टात साक्षीदारही फितून ठरले, अखेर आरोपीला शिक्षा

छत्रपती संभाजीनगर: शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन मित्राच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून करणारा राज नामदेव जाधव (१९, रा. छत्रपती हॉलजवळ, हर्सूल परिसर) याला भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. आगरकर यांनी ठोठावली. या प्रकरणात श्रीकांत सतीश शिखरे (१९, रा. तुळजाभवानी चौक, हिरानगर, मयुर पार्क, हर्सूल) याने फिर्याद दिली होती.
रागात तरुणाचं धक्कादायक कृत्य; खोलीत गेला अन् आग लावली, घटनेत युवक गंभीर जखमी, कारण काय?
फिर्यादीनुसार, आरोपी राज जाधव, मृत यश महेंद्रकर आणि फिर्यादी हे सर्व मित्र होते. २४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास श्रीकांत हा तुळजाभवानी चौकातील बिकानेर मिठाई दुकानासमोर बसलेला होता. त्यावेळी तिथे आरोपी राज जाधव हा मित्र अर्थव टाकळकर, ओंकार कोलते यांच्यासोबत आला आणि ‘आता मी यश महेंद्रकरला मारणार आहे’ असे म्हणाला. श्रीकांत याने राजकडे चौकशी केली असता, ‘यशने शिवीगाळ केल्याने त्याला सोडणार नाही’ असे तो म्हणाला. श्रीकांत त्याला समजावून सांगत असताना राजने यशला फोन करुन तुळजाभवानी चौकात बोलावले.

साडेनऊ वाजेच्या सुमारास एका कारमध्ये आरोपी व फिर्यादीचे मित्र मित्तल उबाळे, अमय म्हस्के, पुष्कर भारंबे असे तिथे आले. त्याचेळी यश महेंद्रकर हा दुचाकीवर तिथे आला. यशला पाहताच राज चाकू घेऊन त्याच्या अंगावर गेला. चाकू पाहून सर्व मित्रांनी राजला पकडले. हे पाहून यशदेखील राजला मारण्यासाठी समोर येत होता. भांडण सुरू असताना राजने यशजवळ येताच त्याच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. यशला विशाल भोसले आणि प्रफुल्ल बोरसे यांनी दुचाकीवर खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना यश महेंद्रकर याचा मृत्यू झाला. प्रकरणात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

२८८ कोटी खर्चून दिंडी मार्ग केला, निकृष्ट कामामुळे रस्त्यावरील भेगा ठरतायत मृत्यूचा सापळा

खटल्याच्या सुनावणीवेळी, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अशोक बी. करंडे यांनी २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात फिर्यादीसह मुख्य आठ साक्षीदार फितूर झाले. तर, तपास अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष महत्वाची ठरली. विशेष म्हणजे या खटल्यात फौजदारी दंड संहितेच्या (सीआरपीसी) कलम ३४० प्रमाणे खोटी साक्ष देणारे आरोपीचे मित्र तथा फिर्यादी श्रीकांत शिखरे, ओंकार कोलते, विशाल भोसले, प्रफुल्ल बोरसे, अमेय म्हस्के, अथर्व टाकळकर, पुष्कर भारंबे व मित्तल उबाळे यांच्यावरही भादंवी कलम १९३ प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचवेळी मृत यश सोमेश महेंद्रकर (रा. एसबीओए शाळेच्या पाठीमागे, हडको) यांच्या आई-वडिलांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश विधी व सेवा प्राधिकरणाला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed