जास्त दिवस घोंगड भिजत ठेवले तर ते वास मारतच. जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केले तर चीड येणारच. हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी मंडल आयोग जाहीर केले, त्या वेळेस सगळे केले असते तर हा विषय राहिलाच नसता, अशा शब्दांत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत भूमिका मांडताना साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
राज्यस्तरीय नियोजन समितीची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पुणे विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक झाली. साताऱ्यातील आढावा बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत विचारता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे आरक्षण वाढवण्याचा निर्णय राज्यपातळीवरील घेण्यात आला, त्याच धर्तीवर राज्यातही आरक्षण वाढवण्यात आले तर हा मुद्दा कोणत्याही समाजाला न दुखावता सुटू शकतो,’ असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या फी मधील तफावतीमुळे समाजातील मुले त्रासली आहेत. त्यामुळे तज्ञांनी यावर विचार करून तोडगा काढणे आवश्यक आहे. इतर राज्यांप्रमाणे राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवा. राज्यात ही आरक्षण वाढवावे. ७०-७२ टक्के आरक्षण करा. हाच पर्याय आहे.
आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना,’ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. ज्यावेळी आपल्याला लोकांची मान्यता असते, त्यावेळी लोकांचा आदर केला पाहिजे. कारण देशात लोकशाही आहे. परिस्थिती बदलत असते. अशी परिस्थिती का झाली याचा विचार त्या पक्षाने केला पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता उदयनराजे यांनी लगावला.
यावेळी त्यांनी साताऱ्यातील प्रश्नासंदर्भात सकारनात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. ‘सातारा जिल्हा हा डोंगरी आणि दुर्गम भाग असल्याने आम्हाला जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे,’ असे खासदार उदयनराजे म्हणाले.