राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची उत्सुकता सर्वांना आहे. या सोहळ्यामुळे राम मंदिराच्या प्रतिकृतींच्या मागणीत ४०० टक्के वाढ झाली आहे. विविध कलांप्रकारांतील कारागिरांना चांगला रोजगार आणि व्यवसाय मिळाला आहे. तशाच प्रकारे चांदीच्या नाण्यांची मागणी वाढली असून काही ठिकाणी नाण्यांचे आगाऊ बुकिंगही केले जात आहे.
खरे तर आता विवाह सोहळ्यांचा हंगाम सुरू होणार असल्याने या काळात सराफा बाजारात त्यासंबंधी दागिन्यांची मागणी असते. यंदा मात्र वेगळे चित्र आहे. लग्नाच्या दागिन्यांपेक्षा श्रीरामाचे चित्र, राममंदिर कोरलेल्या चांदीच्या नाण्यांची मागणी अधिक आहे – शंकर ठक्कर, सरचिटणीस, अखिल भारतीय व्यापारी महासंघ.
२२ जानेवारीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी नागरिक आगाऊ बुकिंग करीत आहेत. आजवर अन्य देवी-देवतांचे चित्र कोरलेली नाणी असतातच. पण आता राम मंदिर, प्रभू श्रीराम यांची नाणी बाजारात आली आहे. काही ठिकाणी मागणी अधिक असल्याने बुकिंग केले जात आहे. – पराग जैन, सराफा व्यावसायिक
घडणावळीसह ९५० रुपये
श्रीरामाची प्रतिमा असणारे चांदीचे नाणे दहा ग्रॅम वजनात आहे. मुंबई शहर व उपनगरात दररोज साधारण १५०० ते १८००, ठाण्यात २५० ते ३०० व उर्वरित महामुंबई भागात दररोज जवळपास चारशे नाण्यांची विक्री होत आहे. ही नाणी दहा ग्रॅम वजनाची आहेत. चांदीचा दर सध्या साधारण ७१ हजार रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार १० ग्रॅमचे नाणे घडणावळीसह ९५० रुपयांच्या घरात आहे. त्यानुसार महामुंबईत यासंबंधीची दररोजची उलाढाल २२ लाख रुपयांच्या घरात असल्याचे या क्षेत्रातील संबंधितांचे म्हणणे आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News