• Sat. Sep 21st, 2024

कोथरूडमध्ये गुंड भाजपला मदत करतात, पोलिसही त्यांना हात लावत नाहीत, धंगेकर यांचा गंभीर आरोप

कोथरूडमध्ये गुंड भाजपला मदत करतात, पोलिसही त्यांना हात लावत नाहीत, धंगेकर यांचा गंभीर आरोप

पुणे : कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे. गेली कित्येक वर्ष कोथरूडमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत. ते गुन्हेगार भाजपसाठी काम करतात. त्यामुळे पोलिसही त्यांना हात लावत नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी शरद मोहोळच्या हत्येनंतर केला आहे.

ललीत पाटील प्रकरणात डीन संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीत पत्रकार परिषद घेतली. ललीत पाटील प्रकरणाबरोबरच त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. प्रामुख्याने पुण्यातील गुन्हेगारीवर बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले. सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच पुण्यातील गुन्हेगारांची दहशत वाढत असल्याचं धंगेकर म्हणाले.

लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेसची पुण्यात महत्वाची बैठक होणार, नक्की कोणाला उमेदवारी मिळणार ?
धंगेकर म्हणाले, कोथरूडमध्ये गेली कित्येक वर्षे गुन्हेगारांचं वर्चस्व आहे. गुन्हेगारांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत. अनेक निवडणुकांत ते गुन्हेगार भाजपसाठी काम करत असतात. काही गुंड तर भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतात. त्यामुळे पोलीसही त्यांना हात लावत नाहीत. म्हणून कोथरूड भय मुक्त करा, अशांत झालेल्या कोथरूडला शांत करा, अशी काँग्रेस पक्षाची सरकारकडे मागणी असल्याचं ते म्हणाले.

कोथरूडमध्ये अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. ज्या गुन्हेगारांना राजकीय आसरा दिला, ते कोथरूडमधील निवडणूक असेल किंवा कसबा पोटनिवडणूक असेल, त्यासाठी हे गुन्हेगार भारतीय जनता पार्टीसाठी काम करत होते. पोलीस या गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न करत नाही कारण हे गुन्हेगार भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतात, असा सनसनाटी आरोप धंगेकर यांनी केला. सर्वसामान्य लोकांना दहशतीमुळे जगणं मुश्किल झालंय. शाळा कॉलेजातील तरुण मुलांचा गुन्हेगारीकडे ओढा वाढतो आहे, अशी चिंताही आमदार धंगेकर यांनी बोलून दाखवली.

ललित पाटील प्रकरणात मुख्य आरोपी संजीव ठाकूरला अटक करा | रविंद्र धंगेकर

दुसरीकडे ललीत पाटील प्रकरणात ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डीन राहिलेल्या संजीव ठाकूरवर अद्याप कारवाई का होत नाही? त्यांना कोणता राजकीय नेता वाचवतो आहे? लवकरात लवकर पोलीस तपास होऊन त्यांच्यावर कारवाई झालीच, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed