• Mon. Nov 25th, 2024

    नगरमध्ये सुरू होती चोरी, मुंबईत अलार्म वाजला अन् ATM फोडण्याचा डाव उधळला; चौघांना रंगेहात पकडले

    नगरमध्ये सुरू होती चोरी, मुंबईत अलार्म वाजला अन्  ATM फोडण्याचा डाव उधळला; चौघांना रंगेहात पकडले

    अहमदनगर : अलीकडे चोरट्यांनी बँकांची एटीएम लक्ष्य केली आहेत. कोठे ती फोडून तर कोठे वाहनाने ओढून नेऊन चोरी केल्याचे आढळून येते. अशा अनेक गुन्ह्यांत चोर पकडले जाणे अवघड होते. मात्र, बँका आणि पोलिस दोघांनी सतर्कता आणि तातडीने हालचाली केल्यास चोर जागेवर पकडले जाऊ शकतात, हे सोमवारी पहाटे पारनेर तालुक्यातील घटनेतून सिद्ध झाले.

    पारनेर तालुक्यात पहाटे चोरटे स्टेट बँकेचे एटीएम फोडत होते. त्याचा संदेश बँकेच्या मुंबईतील कंट्रोलरूमला मिळाला. त्यांनी तातडीने सुपे (ता. पारनेर) पोलिसांना याची माहिती दिली. सुपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चोरटे रंगेहात पकडले गेले. चोरांविरूद्ध पुणे जिल्ह्यात एटीएम आणि इंधन चोरीचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.

    यासबंधी माहिती अशी, सुपा-पारनेर शहाजापूर चौकातील मळगंगा इमारतीत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास तेथे आलेल्या चौघांनी ते फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. एसबीआयने आपल्या एटीएमच्या सुरक्षेसाठी अद्ययावत यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे इकडे एटीएमशी झटापट सुरू होताच मुंबईतील नियंत्रण कक्षाला संदेश गेला. तेथील अधिकाऱ्यांच्या चोरी होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ एटीएम ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्या सुपे पोलिस ठाण्यात संपर्क साधला. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी याची माहिती देण्यात आली.

    सुपे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे चोरीचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहिले. पोलिसांनी दत्तात्रय विठ्ठल विरकर, अनंतकुमार नवनाथ गाडे (रा. लोणी काळभोर, जि. पुणे), आरोपी इसाक मचकुरी, चौथ्या आरोपीचे नाव समजू शकले नाही यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी पक्कड, कटावणी, गॅस कटर, छोटा गॅस सिलेंडर, एक मोटारसायकल, असे साहित्य ताब्यात घेतले. बँकेची कंट्रोलरूम आणि सुपे पोलिसांची तत्परता यामुळे एटीएम चोरी होता होता वाचली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed