• Sat. Sep 21st, 2024

कोल्हापूरच्या जागेवर मविआतील तिन्ही पक्षांचा दावा, उमेदवार मात्र वन अँड ओन्ली शाहू महाराज!

कोल्हापूरच्या जागेवर मविआतील तिन्ही पक्षांचा दावा, उमेदवार मात्र वन अँड ओन्ली शाहू महाराज!

गुरुबाळ माळी, कोल्हापूर: ‘कोल्हापूर लोकसभेची जागा आम्हालाच मिळावी’ असा दावा महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे, मात्र सर्वच पक्षांचे उमेदवारीसाठी लक्ष मात्र श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यावरच असल्याचे दिसत आहे. त्यांनी मैदानात उतरण्यास नकार दिला असतानाही त्यांच्याकडे आग्रह धरतानाच अचानक माजी खासदार संभाजीराजे यांनीही मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

सध्या राज्यात महाविकास आघाडी अंतर्गत जागावाटप आणि उमेदवारी बाबत चर्चा बैठका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जागेवर तिन्ही पक्षाचे नेते दावा करत आहेत. यापूर्वी ही जागा शिवसेनेने लढवल्याने आणि निवडूनही आल्याने आमचा नैसर्गिक हक्क असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे मत आहे. हीच स्थिती राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे. यामुळे या दोघांचे पारडे जड असतानाच या मतदारसंघात तीन तीन विधानसभा आणि दोन विधान परिषदेचे आमदार काँग्रेसचे असल्याने आणि ताकद चांगली असल्याने ही जागा हाताच्या चिन्हावर लढवण्याची इच्छा नेते व्यक्त करत आहेत. प्रत्येक पक्षाकडे तीन ते चार इच्छुक उमेदवारही आहेत. उमेदवारी मिळाल्यास लढण्याची तयारी ठेवत व्ही. बी. पाटील, चेतन नरके, बाजीराव खाडे, संजय घाटगे हे तयारीलाही लागले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर सध्या तीनही पक्षांचे उमेदवारीसाठी लक्ष मात्र श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असल्याचे दिसत आहे. महाराजांनी धुमधडाक्यात साजरा केलेला अमृत महोत्सवी वाढदिवस, मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यास, अंतरवाली सराटी गावात लावलेली उपस्थिती, शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील संघर्षा वेळी थेट रस्त्यावर उतरत समझोता घडवून आणण्याचा केलेला प्रयत्न यासह अन्य काही घटनांमुळे महाराज लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासाठी त्यांच्या मागे उमेदवारीसाठी आग्रह सुरू आहे.

त्या जखमा मी अजून विसरलेलो नाही, संभाजीराजे कोल्हापुरातून लोकसभा लढविण्याचे संकेत

कोल्हापूरची जागा तीन पैकी कोणत्याही पक्षाला मिळाली तरी तिघांची पहिली पसंती ही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते प्राधान्य देण्याची शक्यता अधिक आहे. जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडेच राहिली तर ते सेनेच्या चिन्हावरही मैदानात ते उतरू शकतील. सद्यस्थितीला या मतदारसंघात काँग्रेसची ताकद अधिक असल्यामुळे कदाचित या पक्षाचा विचार होऊ शकतो. मात्र, जागा वाटपात शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे. कोणत्या चिन्हावर निवडणूक अधिक सोपी जाईल यावरच पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शाहू महाराजांच्या नावाबाबत चर्चा सुरू असताना अचानक माजी खासदार संभाजीराजे यांनीही शड्डू ठोकला आहे. २००९ मध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्याने ते आता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तशी स्पष्ट घोषणा त्यांनी कोल्हापुरात केली आहे.

व्ही. बी. पाटील यांचे नाव आघाडीवर

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा नकार कायम राहिला तर उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट चिन्हे आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांची असलेले त्यांचे संबंध, गेले अनेक वर्षे क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, बांधकाम यासह विविध क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. ते अनेक संघटना आणि संस्थावर पदाधिकारी, संचालक आहेत. यामुळे त्या संबंधांचा उपयोग चांगला होऊ शकतो. महाराज यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही पाटील यांचेच नाव पुढे येऊ शकते. ते पवार कुटुंबाशी निष्ठावंत असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या नावाचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले वर्षभर पाटील विविध माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी संपर्कही वाढवला आहे. सध्या पक्षापेक्षा उमेदवार महत्त्वाचा असल्याने कोणत्याही पक्षाची उमेदवारी त्यांना मिळू शकते. यामुळे व्ही. बी. पाटील हे देखील राष्ट्रवादी अथवा काँग्रेसचे उमेदवार होण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज उमेदवार असू शकतो, सतेज पाटील काय म्हणाले?

नकार.. हालचाली.. आग्रह

एकीकडे उमेदवारासाठी नकार देत असताना गेल्या तीन-चार महिन्यात ज्या पद्धतीने वाड्यावर हालचाली सुरू आहेत, त्यातून प्रचंड आग्रहानंतर महाराज मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी 7 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे, यानिमित्ताने त्यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे, मात्र, त्यांनी स्पष्ट नकारच दिला तर पर्यायी उमेदवार म्हणून व्ही. बी. पाटील, चेतन नरके आणि संजय घाटगे या तीन नावाबाबत निर्णय होऊ शकतो. तशा हालचाली सुरू झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed