• Sat. Sep 21st, 2024
गुप्त माहितीच्या आधारे घरात पोलिसांची धाड; दोघांना पकडलं, हिंगोलीत नेमकं काय घडलं?

हिंगोली: शहरातील बनसोंड भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ५ जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका घरावर छापा टाकला. यात तब्बल ४.७२ लाख रुपये किंमतीचा २० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतले आहे.
गँगस्टर शरद मोहोळची हत्या, बॉडी ससूनमध्ये दाखल, रुग्णालयाबाहेर चारशे-पाचशे जणांचा जमाव
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात वाटमारी रोखण्यासाठी आणि होत असलेल्या छुप्या चोऱ्या रोखणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रात्र गस्तीसाठी तयार करण्यात आलेली आहेत. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशावरून धडक कारवाई मोहीम देखील राबविण्यात येत आहे. यावेळी बळसोंड भागातील एका घरात गांजाची साठवण करून ठेवण्यात आली असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने परसराम मस्के यांच्या घरी जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी परसराम मस्के आणि रवी पोले या दोघांनी मिळून एका नायलोनच्या पोत्यात गांजाची साठवण केल्याचे आढळून आले.

घरातील सर्व परिसर पोलिसांनी पिंजून काढला. यामध्ये तब्बल २० किलो ६०० ग्राम गांजा एक मोटरसायकल आणि मोबाईल असा ४ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे‌. शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा लागवड आणि विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बळसोंड भागात राहणारे परसराम सुभाषराव मस्के आणि रिसाला भागातील रवी रुस्तुमराव पोले हे दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एका पांढऱ्या रंगाचे नायलोन पोत्यामध्ये गांजाच्या झाडाचा बारीक केलेला अर्धवट ओलसर पालापाचोळा हिरव्या रंगाचा आणि उग्रट वास येत असलेला याचे वजन २० किलो ६०० ग्राम किंमत ४ लाख १२ हजार गांजा जप्त केला.

६०० ते ७०० एकरावर गाजराची शेती, कवलापूर गाजराला महाराष्ट्रासह कर्नाटकातही मागणी

हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, पारू कुडमेथा, राजु ठाकुर, नितीन गोरे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed