• Sun. Sep 22nd, 2024
ऊसतोड कामगारांची दिवाळी; पवार-मुंडेंनी तोडगा काढला आणि संघर्ष टळला

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये ९२ रुपयांची वाढ करण्यात आलीय. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला.

पुण्यातील साखर संकुल मध्ये साखर कामगार आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. अपेक्षित दरवाढ न दिल्यास कोयताबंद आंदोलनाचा इशारा ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी दिला होता. राज्य साखर महासंघाचे पी आर पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर महासंघाचे संचालक जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आदी बैठकीसाठी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांना सध्या २७४ रुपये प्रति टन मजुरी दिली जाते. त्यात ३४ टक्के दरवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना चालू हंगामापासून ३६६ रुपये प्रति टन इतकी मजुरी मिळणार आहे. दरम्यान मुकादम यांच्या कमिशनमध्ये देखील एक टक्क्याची वाढ करण्यात आली असून त्यांना मजुरीच्या २० टक्के कमिशन देण्यात येणार आहे.

आता फक्त रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, पंकजांचा शिंदे फडणवीस सरकारला इशारा

दुसरीकडे, राज्यातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच काम अपेक्षित गतीने पुढे जात नाहीये. त्याबद्दल आपण असमाधानी असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलय. या संदर्भात आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं देखील पंकजा मुंडे पुण्यात म्हणाल्या.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहिल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांचे विशेष आभार मानले. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रभू श्रीरामाविषयी काय बोलले ते आपल्याला माहीत नसल्याचं सांगत अजय आणि त्या विषयावर प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed