घोरपडी परिसरातून रेल्वेचे दोन ट्रॅक जातात. एक ट्रॅक हा पुणे-मिरज आणि दुसरा ट्रॅक पुणे-सोलापूर असा आहे. या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेचे २०१६पासून प्रयत्न सुरू आहेत. घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवर क्रॉसिंग असून, तेथे उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट क्राँक्रिटद्वारे उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. रेल्वे ट्रॅकवर लोखंडी सांगाडा उभारण्याच्या रखडलेल्या कामाबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कार्यवाही करून या सांगाड्यास मान्यता दिली आहे.
हा सांगडा उभारल्यानंतर या पुलावरून वाहतुकीस ये-जा करता येणार आहे. महापालिका प्रशासनाने हा सांगडा बनविण्यासाठी रेल्वेने नियुक्त केलेल्या सासवड येथील कंपनीस काम दिले होते. त्यासाठी आवश्यक सल्लागार कंपनीही रेल्वेने नियुक्त केलेली होती. प्रशासनाने त्यानुसार हा सांगडा सासवड येथील कंपनीकडून काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला. त्या सांगाड्याची रेल्वे प्रशासनाकडून तपासणी करून त्यास मान्यता देण्यास विलंब झाल्याने त्याच्या उभारणीस उशीर झाला होता. रेल्वे प्रशासनाने अखेरीस त्यास मान्यता दिल्याने सहा ते आठ जानेवारी दरम्यान हे काम करण्यात येणार आहे.
या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे मोठे ‘गर्डर’ रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले आहेत. हे गर्डर रेल्वे ट्रॅकच्या बाजूने उभे करावे लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक परवानगी आणि संभाव्य रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे प्राथमिक काम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे. त्यासाठी या परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
दीड महिने प्रतिदिन दीड तासांचा ‘ब्लॉक’
घोरपडी येथील उड्डाणपुलासाठी आवश्यक लोखंडी सांगाड्यास परवानगी मिळाली असून, तो उभारण्यासाठी किमान दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी प्रतिदिन दीड तासांचा ‘ब्लॉक’ घ्यावा लागणार आहे. या दीड तासातच काम करावे लागणार आहे. त्यामुळे अत्यंत चिवट असलेले हे काम वेळेत पूर्ण करून हा उड्डाणपूल सुरू करण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे. गर्डरची उभारणी झाल्यानंतर पुढील कामाचे नियोजन करण्यात येणार आहे.
रेल्वे उड्डाणपुलाचा खर्च : ४८ कोटी रुपये
पुलाची लांबी : ४९३ मीटर
पुलाची रुंदी : मुंढवा रस्त्याकडे : १०.५ मीटर, बी. टी. कवडे रस्त्याकडे : ६.५ मीटर
पोहोच रस्त्यांची लांबी : एक किलोमीटर
सेवा रस्त्यांची लांबी : दीड किलोमीटर
Read Latest Maharashtra News And Marathi News