सन २०१५ मध्ये जिल्ह्यात २४ हजार ८८१ रुग्णांच्या क्षयरोगासाठी चाचण्या झाल्या आणि त्यातील एक हजार ३२ रुग्णांना क्षयरोग असल्याचे वैद्यकीय चाचण्यांमध्ये निदान झाले. त्यानंतर २०१६ मध्ये २६ हजार ५३ चाचण्यांमध्ये ९७९ क्षयरुग्ण आढळले. २०१७ मध्ये २८ हजार १७० चाचण्या व १८६७ रुग्ण, २०१८ मध्ये २८ हजार २१९ चाचण्या व एक हजार ९३६ रुग्ण, २०१९ मध्ये ३० हजार २७२ चाचण्या व एक हजार ८९६ रुग्ण, २०२० मध्ये २३ हजार ४१० चाचण्या व एक हजार १५० रुग्ण, २०२१ मध्ये २८ हजार ९९९ चाचण्या व ८३३ रुग्ण, २०२२ मध्ये ५० हजार ८९३ चाचण्यांमध्ये ९८१ क्षयरुग्ण आढळले. त्याचप्रमाणे २०२३ मध्ये म्हणजेच जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या काळात ३९ हजार ५१७ चाचण्यांमध्ये ५९७ क्षयरुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ २०१५ या वर्षांत २४ चाचण्यांमध्ये एक क्षयरुग्ण आढळत होता; तर २०२३ या वर्षांत ६६ चाचण्यांमध्ये एक क्षयरुग्ण आढळत आहे. साहजिकच क्षयरोगाचे प्रमाण आढळून येण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे आणि या व इतर निकषांच्या आधारे राष्ट्रीय सुवर्णपदकाच्या स्पर्धेसाठी राज्यातून केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड झाली आहे, याकडे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर यांनी लक्ष वेधले.
सर्वाधिक मृत्यूच्या यादीतले सहावे कारण
अजूनही म्हणजेच २०२३ मध्येही सर्वांत जास्त मृत्यू पावणाऱ्या भारतीय व्यक्तींच्या आजारांमध्ये क्षयरोग हा सहाव्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२५ पर्यंत क्षयमुक्तीची मोहीम यापूर्वीच जाहीर केली आहे. त्याचाच भाग म्हणून २०१५ मध्ये एक लाख लोकसंख्येमागे आढळून आलेल्या २१६ क्षयरुग्णांचे प्रमाण ४४ क्षयरुग्णांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. त्याचवेळी मृत्यू दर एक लाख लोकसंख्येमागे ४४ पासून तीनपर्यंत खाली आणणे आणि रुग्णांच्या आजारांसाठी होणारा खर्च शून्यापर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे उद्दिष्ट गाठण्यात हातभार लागावा या हेतुने राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची स्पर्धा घेतली जात आहे आणि याचा निकाल क्षयरोगदिनी म्हणजेच २४ मार्च २०२४ रोजी जाहीर होणार आहे.
रुग्णशोध मोहीम, उपचार व उपाय योजनांमुळेच क्षयरोगाचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाले आहे व सुवर्णपदकाच्या स्पर्धेसाठी एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्हा पात्र ठरला आहे. राज्याच्या क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिला गोल्हाईत, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या प्रेरणेमुळेच जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.-डॉ. गणेश कल्याणकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी