• Mon. Nov 25th, 2024

    गुड न्यूज! मॅरेज सर्टिफिकेटही ‘डिजीलॉकर’वर, काही मिनिटांत घरबसल्या होणार काम, कसे ते वाचा

    गुड न्यूज! मॅरेज सर्टिफिकेटही ‘डिजीलॉकर’वर, काही मिनिटांत घरबसल्या होणार काम, कसे ते वाचा

    पुणे : लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) काढणे आणि ते सांभाळणे अनेकदा त्रासदायक ठरते. मात्र, आता हेच प्रमाणपत्र थेट ‘डिजीलॉकर’वर उपलब्ध करून देऊन पुणे महापालिकेने नागरिकांना दिलासा दिला आहे. अशी सुविधा देणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली असून, लवकरच पुणेकरांना केवळ प्रत्यक्ष जन्मदाखला दाखवून पासपोर्ट काढणेही शक्य होणार आहे.

    केंद्र सरकारच्या ‘डिजीलॉकर’ या सुविधेद्वारे नागरिकांना आपली व्यक्तिगत कागदपत्रे उदाहरणार्थ, आधार कार्ड, गाडी चालविण्याचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड आदी मोबाइलवर ऑनलाइन उपलब्ध झाली आहेत. यामुळे ही सर्व कागदपत्रे सोबत बाळगण्याची आवश्यकता भासत नाही. इतर कागदपत्रांप्रमाणेच लग्नाच्या प्रमाणपत्राचाही या यादीत समावेश केला गेला आहे. या प्रणालीची प्राथमिक चाचणी पार पडली असून, देशात ही सुविधा पहिल्यांदा पुण्यात सुरू झाली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना पासपोर्ट काढताना होणाऱ्या संभाव्य त्रासातून सुटका होणार असल्याचा दावा महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांनी केला आहे.

    केंद्र सरकारने पासपोर्ट काढताना अनेक आधुनिक प्रणालींचा वापर सुरू केला आहे. नागरिकांनी कुठलीही कागदपत्रे न बाळगता त्यांना पासपोर्ट देण्याची योजना असून, त्यात लग्नाचे प्रमाणपत्र हा कळीचा मुद्दा ठरला आहे. पुणे महापालिकेने त्यांच्या ऑलनाइन प्रणालीद्वारे हे प्रमाणपत्र ‘डिजीलॉकर’ या यंत्रणेशी जोडले आहे. ‘डिजीलॉकर’ या अॅपमध्ये लग्नाच्या प्रमाणपत्राचा नंबर टाकल्यास नागरिकांना त्यांचे प्रमाणपत्र ऑनलाइन मिळू शकणार आहे.

    आधार कार्ड, पॅनकार्ड, लग्नाचे प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे ‘डिजीलॉकर’वर उपलब्ध होऊ लागली आहेत. याला जन्माच्या दाखल्याची जोड मिळाल्यास प्रत्यक्ष कुठल्याही कागदपत्राविना केवळ ऑनलाइन प्रमाणपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढणे शक्य होणार आहे.

    पुणे महापालिकेने लग्नाचे प्रमाणपत्र ‘डिजीलॉकर’वर उपलब्ध केले असून, त्याची चाचणी यशस्वी ठरली आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारने इतर राज्यांतील शहरांनाही याच पद्धतीने त्यांची प्रणाली विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पुण्यात प्रत्यक्ष केवळ जन्म दाखला दाखवून पासपोर्ट मिळवणे शक्य होणार आहे.
    पासपोर्ट वितरणातही पुणे नाही उणे; १० वर्षांच्या तुलनेत यंदा प्रमाण दुप्पट, काय सांगते आकडेवारी?
    अडचण जन्मदाखल्याची…

    जन्म आणि मृत्यूचा दाखला देण्याची प्रणाली ही राज्य सरकारच्या अखत्यारित असून, संपूर्ण राज्यासाठी ती एकच आहे. त्यात काही त्रुटी असून, त्या दूर करण्यासाठी विलंबही होतो आहे. राज्य सरकारने ही कागदपत्रे ‘डिजीलॉकर’वर उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा होणार आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारी कागदपत्रे उदाहरणार्थ, आधार कार्ड, पॅन कार्ड, गाडी चालविण्याचा परवाना, लग्नाचे प्रमाणपत्र, जन्म दाखला, मृत्यू दाखला, शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यास आणि सरकारी योजना, कामांसाठी या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन झाल्यास नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

    पुणे महापालिकेस ‘डिजीलॉकर’वर लग्नाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. ही सुविधा देणारी पुणे देशातील पहिली महापालिका ठरली आहे.- राहुल जगताप, विभागप्रमुख, माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे महापालिका

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed