रक्ताची बचत करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा तातडीने सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. सद्यस्थितीत राज्यातील बहुतांश सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये अशा पद्धतीची यंत्रणा नाही. परिणामी बालरुग्णांना रक्त देताना ३५० मिलिलिटर क्षमतेच्या रक्तपिशवीतून दिले जाते. बालरुग्णांच्या वजनानुसार आणि प्रकृतीनुसार रक्त देण्य़ाचा निर्णय बालरोगतज्ज्ञ घेत असतात. त्यामुळे कधी १००, तर कधी ५० मिलिलिटर रक्त बालकाला द्यावे लागते, उर्वरित वाया जाते. बालकाला यानंतरही रक्ताची गरज भासल्यास पुन्हा ३५० मिलिलिटर रक्ताच्या पिशवीचा वापर केला जातो. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रक्ताचा अपव्यय होण्याचे प्रमाण मोठे आहे.
हा अपव्यय टाळण्यासाठी स्टर्लिंग कनेक्टिंग डिव्हाइस यंत्रणेचा वापर करून अॅलोकेट बॅगद्वारे बालकांना आवश्यक तितकेच रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या यंत्रणेमुळे बालरुग्णांसाठी आवश्यक तितकेच रक्त सुलभपणे घेता येणार आहे. तसेच रक्तपेढ्यांना रक्ताची बचतही करता येणार आहे. पुण्यासह राज्यात अनेकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो. रक्तपेढ्यांमध्ये अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास रक्ताची बचत होऊन गरजूंना रक्त मिळणे शक्य होणार आहे.
नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा झाली होती. राज्यातील आरोग्य विभागाच्या ३१ पैकी केवळ आठ रक्तपेढ्यांमध्ये या प्रकारची यंत्रणा आहे, तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या १४ रक्तपेढ्यांपैकी केवळ तीन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली होती.
अॅलोकेट बॅगद्वारे रक्त दिल्याचे फायदे
रक्ताचा अपव्य टळणार
आवश्यकतेनुसार रक्ताची पिशवी तयार करता येणार
एकाच रक्तपिशवीतून गरजेनुसार रक्ताची विभागणी करता येणार
उर्वरित रक्ताचा पुन्हा वापर करण्यात येणार
रक्ताचा अपव्यय टाळण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये स्टर्लिंग कनेक्टिंग डिव्हाइस ही यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या यंत्रणेमुळे रक्ताची बचत होणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा लहान बालकांना होणार आहे. ज्या सरकारी रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा नाही तिथे ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.