नवीन वर्षाची सुरुवात असो की वर्षाअखरेचा सूर्यास्त, पर्यटक दिवसभराच्या सहलीसाठी सिंहगडावर जातात. यंदा रविवारची सुटी असल्याने पर्यटकांनी सकाळीच खडकवासला, सिंहगड आणि पानशेतच्या दिशेने मोर्चा वळवला. गर्दी अपेक्षित असल्याने पोलीस आणि वन विभागाने सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला होता. गडावर मद्य घेऊन जाणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने आठवडाभर आधीच दिला होता.
त्यानुसार वन कर्मचारी, शिवप्रेमी संघटना राजा शिवराय प्रतिष्ठानतर्फे गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर पर्यटकांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करत गडावर मद्याच्या बाटल्या, धुम्रपानाचे साहित्य घेऊन जाणाऱ्यांचे साहित्य जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे यांसह चाळीस कार्यकर्ते या मोहीमेत सहभागी झाले होते.
दुपारनंतर पर्यटकांची गर्दी वाढल्याने गडावरच्या वाहनतळाची क्षमता संपली होती. घाटातील कोंडी टाळण्यासाठी पर्यटकांना पायथ्याला थांबविण्यात आले. पर्यटकांकडून दिवसभरात १ लाख ४७ हजार रुपये प्रवेश शुल्क जमा करण्यात आले. वनव्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक आणि वन कर्मचारी घाट रस्त्यातही थांबले होते. खानापूचे वनपाल समाधान पाटील आणि वनरक्षक बळीराम वायकर यांनी पर्यटकांच्या बंदोबस्ताचे व्यवस्थापन केले. वनरक्षक ऋषीकेश लाड, सुनीता कुसगावे, गणेश गायकवाड, दयानंद ऐतवाड आणि संदीप कोळी यांनी वाहतूक व्यवस्थापन केले.