एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी
ऑगस्ट महिन्यामध्ये पार पडलेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. मात्र यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनमानी कारभार करत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांचे म्हेवणे सौरभ पाटील यांची नियुक्ती केली. मात्र या नियुक्तीनंतर अनेक जण त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत होते. व्यवस्थापकीय संचालकासाठी असलेल्या निकषांमध्ये सौरभ पाटील हे बसत नसल्याचा प्रमुख आक्षेप होत होता. तर मागील काही महिन्यांत सदावर्ते यांच्याकडून मनमानी कारभार चालू होता संचालकांना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेण्यात येत होते. असा आरोप करत १९ पैकी तब्बल १४ संचालकांनी त्यांच्या विरोधात बंड केला.
सदावर्ते यांच्या मनमानी कारभारामुळे बँकेतील ठेवी मोठ्या प्रमाणात काढून घेतल्या जात आहेत. यामुळे बँक संकटात येत आहे असे बंडखोर संचालकांच्यावतीने सहकार आयुक्तांकडून पत्र लिहून सौरभ पाटील यांना काढून टाकण्यास सांगितले होते. दरम्यान सहकार आयुक्तांनी सौरभ पाटील यांची नियुक्ती ही निकषात बसत नसल्याचे सांगत एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी केली आहे. यामुळे गुणरत्न सदावर्ते त्यांना मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश करणार
तर दुसऱ्या बाजूला आता सदावर्ते यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले कर्मचारी देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील तब्बल २५ हजारहून अधिक सभासद असलेली संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेतील सभासद संघटनेला सोडचिठ्ठी देणार आहेत. सौरभ पाटील यांची पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर बंडखोर संचालकांचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया देत जैसे त्याचे कर्म तसे त्याचे फळ म्हणीप्रमाणे सदावर्ते यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले आहेत. ज्या कायद्याच्या जोरावर त्याने पीएचडी मिळवली त्याच कायद्याने त्यांना कायदेशीर पायतान दिला आहे. यामुळे सदावर्ते यांच्या एसटी बँकेमध्ये सुरू असलेल्या विकृत चाळ्याना पूर्णविराम मिळाला आहे. यापुढे सदावर्ते यांच्या माकड चाळ्याना राज्यातील एसटी कामगार बळी पडणार नाहीत.
एक-दोन जे गाढव (पदाधिकारी) पाळलेले आहेत ते सोडून त्यांच्या कारभाराला कंटाळलेले एसटी जनसंघातील पंचवीस हजार कर्मचारी एक जानेवारीपासून वेगळी भूमिका घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी सेना या संघटनेत आम्ही प्रवेश करणार आहोत. या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे. आमच्या मागण्या संदर्भात ते देखील सकारात्मक असून लवकरच आम्ही राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश करू, असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे