थंडी असल्याने शेकोटी करून थंडीच्या दिवसात ऊब मिळावी यासाठी बेडजवळच शेकोटी ठेवून झोपी गेलेले आजोबा शेकोटीवर पडले आणि मोठा अनर्थ घडला आहे. या घटनेत गोपीनाथ रामचंद्र आमकर या (वय ६२) वर्षीय वृद्धाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आमकर यांना आकडी येण्याचा त्रास होता. अशा स्वरूपाची आकडी आल्यानेच ते शेकोटीवर पडून गंभीररित्या भाजल्याचा प्रकार घडला.
गोपिनाथ रामचंद्र आमकर (रा. कळंबस्ते साठलेवाडी, ता.संगमेश्वर, जि. रत्नागिरी) २३ डिसेंबर रोजी रामचंद्र आमकर रात्री १० वाजण्याच्या सुमारास गोठ्यामध्ये झोपण्याकरता गेले होते. थंडी असल्याने त्यांनी त्याच्या बेडच्या शेजारी शेकोटी पेटवून ठेवली होती आणि काळी वेळाने ते झोपी गेले. मात्र, तासाभरानंतर झोपी गेलेल्या आमकर यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. यावेळी जवळ असलेल्या पुतण्याला व नातेवाईकांना आवाज आल्याने त्यांनी तात्काळ गोठ्याकडे धाव घेतली. समोरील दृश्य भयंकर होतं.
गोठ्यामध्ये जाऊन पाहिले असता त्यांचे चूलते हे बेडशेजारी लावलेल्या शेकोटी मध्ये पालते पडलेले होते. आवाज ऐकून दाखल झालेल्या पुतण्याने त्यांना बाजूला करुन अंगावर पाणी मारुन आग विझवली. या दुर्दैवी घटनेत चुलते हे मानेपासून ते कंबरेपर्यत तसेच डावा हात व नाजूक भागही भाजल्याने त्यांना खासगी वाहनाने तात्काळ ग्रामीण रूग्णालय संगमेश्वर येथे नेण्यात आले. अधिक उपचाराकरता १०८ अँम्बुलन्सने सिव्हिल हाँस्पीटल रत्नागिरी येथे आणले होते. तिथे डाँक्टरांनी ते ६५ टक्के भाजल्याने त्यांना अधिक उपचाराकरता १०८ अॅम्बलन्सने सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवले.
अॅम्बुलन्सने घेऊन जात असताना साखरप्याजवळ दाभोळे या गावी आल्यावर अॅम्बुलन्सचे डॉक्टरांनी त्यांना तपासून ते दि.२४ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. या सगळ्या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन कामेरकर करत आहेत.