मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने मनोरुग्णालयाच्या जागेमध्ये नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुमारे १४४ कोटी ८० लाख रुपये खर्च करून या प्रकल्पाची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
नवीन ठाणे रेल्वे स्थानकास रेल्वेकडून तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मनोरुग्णालयाची जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते.
उच्च न्यायालयाने मनोरुग्णालयाच्या जागेवर कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम होऊ नये, यासाठी त्रयस्थ संस्थेला जागा देण्यास मनाई केली होती. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून ठाणे महापालिकेकडून या जागा राज्य सरकारकडून ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू होता.
अखेर ३ मार्च २०२३ रोजी उच्च न्यायालयाने या रुग्णालयाची १४.८३ एकर जागा हस्तांतरित करण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे जमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने नवी ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
अंदाजे खर्च १४४ कोटी
प्रकल्पाचा अंदाजे खर्च १४४.८० कोटी असून ११९.२४ कोटींची निविदा काढण्यात आली होती. या प्रकल्पासाठी १४२ कोटींची जीएसटी वगळून निविदा मंजुरी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडून त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी सांगितले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
नवीन ठाणे स्थानकातील डेकला तीन वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या उन्नत मार्गाने जोडण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला मार्ग ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या समोरून स्थानकापर्यंत येणार असून त्याची लांबी २७५ मीटर आहे.
दुसरा मार्ग मनोरुग्णालय रस्त्यावरून नव्या स्थानकाकडे येणार असून त्याची लांबी ३२७ मीटर तर तिसरा मार्ग मुलुंड टोलनाक्याकडून अपलॅब चौकाकडून येणार असून त्याची लांबी ३२५ मीटर आहे. या तीनही मार्गिका ८.५० मीटर रुंद असणार आहेत.
हे तीनही मार्ग नवीन ठाणे स्थानकाच्या उन्नत डेकला जोडले जाणार आहेत. हा डेक २७५ मी. लांब आणि ३४ मीटर रुंद असणार आहे. या डेकवर टीएमटीचे बस थांबे असणार आहेत.
डेकच्या खालील रस्त्यावर खासगी वाहने, रिक्षांचा वापर केला जाईल.
या डेकच्या जवळील मोकळ्या जागेत भव्य पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने या प्रकल्पाचे काम सुरू झाल्याचे कंपनीचे समीर फणसे यांनी सांगितले.