• Mon. Nov 25th, 2024
    अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील; प्रताप चिखलीकरांचा खळबळजनक दावा

    नांदेड: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे. अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा चिखलीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

    राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी देखील अशोक चव्हाण भाजप मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र चव्हाण यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुखेड आणि नांदेड मध्ये सुपर वॉरियर्सशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेकजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे आपल्या भाषणात म्हणाले.

    उत्तरेतील भाजपच्या विजयाने महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चाहूल, काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये जाणार?

    येत्या काही दिवसांत हा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडणार आहे. भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालण्यास कोणी इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत आहे, असं सूचक वक्तव्य देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक दावा केला. महाविकास आघाडीची सत्ता असताना अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही. मात्र आताच्या सरकारने चव्हाण यांच्या कारखान्याला भरपूर मदत केली आहे. तसेच त्यांच्या मागण्या देखील पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजप मध्ये प्रवेश करतील असा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया काही मिळू शकली नाही. भाजप खासदाराच्या या दाव्यामुळे काँग्रेस गटात चिंता वाढली आहे.

    काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केलेले भाकीत खरे ठरणार?

    काही दिवसांपूर्वी छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसमधील आमदारांचा एक गट लवकरच भाजपमध्ये जाईल, असे वक्तव्य केले होते. येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधील मोठा आमदारांचा गट भाजपकडे गेल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको, अशी कबुलीच काँग्रेसच्या या नेत्याने दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

    अशोक चव्हाणांच्या निवासस्थानी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची भेट; बाप्पा चरणी नतमस्तक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *