पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालक तथा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड पोलिस मुख्यालय येथे पार पडला. या समारंभात एकूण १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. पोलिस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील एकूण ४८४ ग्रॅम वजनाचे २१ लाख ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चारचाकी दोन वाहने, २२ दुचाकी, ६९ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल फोन, विविध कंपन्यांमधून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि तीन लॅपटॉप असे एकूण एक कोटी २३ लाख १८ हजार; तसेच सायबर गुन्ह्यांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून जप्त केलेली रोख रक्कम ४८ लाख ९४ हजार असा एकूण दोन कोटी ४२ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना प्रदान करण्यात आला.
‘त्यांचा आनंदच कामाची पावती’
पोलिस आयुक्त चौबे म्हणाले, ‘आज ज्यांना हरवलेल्या वस्तू परत मिळाल्या आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पोलिस अधिकारी म्हणून आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली आहे. यापुढेही असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातील. यातून जनतेचे मनोबल वाढेल आणि अधिकाधिक फिर्यादी पुढे येऊन पोलिसांकडे आपल्या तक्रारी दाखल करतील. ज्यांच्या वस्तू हरवतात, त्यांचा तोटा भावनिक, आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाचा असतो. अशा वेळी संयम राखून पोलिसांना सहकार्य केल्यास त्यातून चांगले परिणाम समोर येतात.’
‘तपासही विस्तृत’
आज इंटरनेट युग आले आहे. ऑनलाइन, ‘डिजिटल इकॉनॉमी’द्वारे तांत्रिक गैरफायदा घेतला जातो. भय दाखवून किंवा आमिष दाखवून आपल्यासमोर न येताही आपल्या पैशांवर डल्ला मारला जातो. त्यामुळे पोलिसांचा तपासही विस्तुत स्वरूपाचा झाला असल्याचे चौबे यांनी सांगितले. मुद्देमाल परत मिळालेल्या भारती भंडारी, सुनीता अडसूळ, देवीदास अय्यर यांनीही कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
विनयकुमार चौबे म्हणाले…
– काही सरकारी विभाग किंवा खासगी, कॉर्पोरेट विभागात वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. या सेवांचा दर्जा चांगला असणे गरजेचे असते.
– खासगी संस्था, हॉटेल यांच्याकडून चांगल्या सेवा न मिळाल्यास नागरिकांना दुसरा पर्याय उपलब्ध असतो.
– मात्र, पोलिस, अग्निशमन दल यांसारख्या विभागांत दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सेवांचा दर्जा नेहमीच न चुकता चांगलाच ठेवावा लागतो. त्यात तडजोड होऊ नये, ही वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी असते.