गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर हे शिर्डी ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला होता. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाशंकर यांचा मनमानी कारभार त्यांच्यासमोर मांडला होता.
आज राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश काढले असून कार्यमुक्त होण्याचे आदेश देऊन साईबाबा संस्थानचे इतर अधिकाऱ्यांना आपले पदभार सोपवून पदभार सोडण्याचे तात्काळ आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयाने शिर्डी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
साईबाबा संस्थान हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्याने देश विदेशातील लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर हे साई भक्तांच्या हिताचे निर्णय घेताना कमी पडत होते आणि साई संस्थानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निर्णयामध्ये शिर्डी ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नव्हते. साईबाबा संस्थानची नवीन दर्शन रांग नियोजन असेल किंवा साईबाबा संस्थान मध्ये भक्तांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांना गांभीर्याने घेत नसल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहे.
पी. शिवाशंकर यांच्या मनमानीच्या विरोधात शिर्डीच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येत नागपूर अधिवेशन दरम्यान राज्याचे महसूल मंत्री तथा शिर्डीचे लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत साईबाबा संस्थान विषयी अनेक मागण्या केल्या होत्या त्यामध्ये सीईओ शिवा शंकर यांच्या बदलीची प्रमुख मागणी होती ती शासनाने तात्काळ मान्य केली आहे.
सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांची एक मागणी शासनाने तात्काळ मान्य केली असून साई संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ नेमणे त्यामध्ये ५० टक्के स्थानिक विश्वस्त असावेत. तसेच शिर्डी विकासाचे इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करून निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असून आता साईबाबा संस्थानला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण येणार? आणि सक्षमपणे साईबाबा संस्थानचा कारभार आणि भक्तांच्या हिताचा निर्णय घेणारा अधिकारी मिळणार का? याकडे शिर्डीकरांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News