मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड दाऊद होता. मुंबईत हे स्फोट होण्याच्या आधी दाऊदने भारत सोडले होते. गेल्या ३० वर्षापासून तो कराचीमध्ये राहतोय. अर्थात पाकिस्तानने हे कधीच मान्य केले नाही. आता मात्र या वृत्ताने पाकिस्तानची गोची झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी दिली आहे. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात निकम यांनीच सरकारची बाजू मांडली होती.
काय म्हणाले उज्वल निकम…
दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे नाकारत आलेल्या पाकिस्तानची दाऊद इब्राहीमवर विषप्रयोग झाल्याची बातमी आल्याने आता फार मोठी गोची झाली असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी अलिबाग येथे पत्रकारांना दिली आहे. आज अलिबाग येथे बलात्कार व हत्या प्रकरणातील खटल्यात न्यायालयीन कामासाठी आले होते. कोर्टाबाहेर पत्रकारांनी दाऊद इब्राहिम बाबत त्यांची प्रतिक्रिया घेतली.
पाकिस्तानला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल. याचे कारण असे आहे की, आजपर्यंत पाकिस्तान नेहमीच नाकारत आलाय की दाऊद इब्राहीम आमच्या इथे नाही. मग कोणत्या तोंडाने आज जाहीर करेल की, दाऊद इब्राहिमला आज विष प्रयोग झाला आणि कशा रीतीने तो पाकिस्तान आरोप करेल की तो भारतातर्फे करण्यात आला. त्यामुळे दाऊद इब्राहिम पेक्षा पाकिस्तान पेक्षा मोठी गोची झाली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याचे दहशतवाद्यांचे चॅनल हे बिंग जगासमोर उघडकीला येवू नये म्हणून पाकिस्तान हे लपवीत आहे, असेही ते म्हणाले.