• Sun. Sep 22nd, 2024

जिल्ह्यात २७ नवीन रूग्णवाहिका दाखल होणार; आरोग्य व्यवस्था सक्षम होणार

ByMH LIVE NEWS

Dec 18, 2023
जिल्ह्यात २७ नवीन रूग्णवाहिका दाखल होणार; आरोग्य व्यवस्था सक्षम होणार

जळगाव, दि.१८ डिसेंबर (जिमाका) – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन १९ रूग्णवाहिका खरेदीस काल मंजुरी दिली. मागील महिन्यात ग्रामीण रूग्णालयांसाठी मंजूर केलेल्या ८ रूग्णवाहिका व आज प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या १९ रूग्णवाहिका अश्या एकूण २७ रूग्णवाहिका जिल्ह्यात फेब्रुवारी पर्यंत दाखल होतील. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२३ – २४ (सर्वसाधारण) निधीच्या माध्यमातून रूग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परवानगी दिली आहे.   जिल्ह्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे (ता.अमळनेर), तामसवाडी (पारोळा), लोंढे, तरवाडे, खेडगाव (चाळीसगाव)

वरखेडी, लोहटार (पाचोरा),

कठोरा, वराडसिंम, पिंपळगाव (भुसावळ), अंतुर्ली (मुक्ताईनगर), भालोद, सावखेडा (यावल), नशिराबाद (जळगाव), भालोद (रावेर), गारखेडा, वाकडी (जामनेर),  चांदसर,  पाळधी (धरणगाव) साठी १९ नवीन रूग्णवाहिकांना पालकमंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. लवकरच याबाबत तांत्रिक मंजुरी साठी नाशिक उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येऊन दोन दिवसांत मान्यता घेतली जाईल. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येऊन फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन १९ अद्यावत रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी दिली आहे.

जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना ८ नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नोव्हेंबर २०२३ महिन्यात मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रूग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावास आरोग्य सेवा आयुक्तांनी एका दिवसातच तांत्रिक मान्यता दिली होती. या रूग्णवाहिकांची सध्या टेंडर  प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जानेवारी २०२४ पर्यंत या नवीन ८ रूग्णवाहिका ग्रामीण रूग्णालयात रूग्णसेवेत दाखल होणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालय व त्यांच्या अधिनस्त ७ ग्रामीण रूग्णालयांमध्ये न्हावी (यावल) अमळगांव (अमळनेर),  मेहुणबारे (चाळीसगांव), पिंपळगांव हरेश्वर (पाचोरा), बोदवड, एरंडोल, भडगांव या ८ रुग्णालयांसाठी प्रत्येकी १ (रुपये १८,०६,३००/- प्रति रुग्णवाहिकाप्रमाणे) अशा एकूण ८ पेशंट ट्रान्सपोर्ट टाईप बी एसी रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.

“जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वेळोवळी मदत करण्यात येत असते. नवीन रूग्णवाहिकांचा जिल्ह्यातील सर्वसामान्य रूग्णांना फायदा होणार आहे. भविष्यात ही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed