• Sat. Sep 21st, 2024

३४ वर्षांपूर्वी कोट्यवधींचा घोटाळा; अखेर सूत्रधाराची मालमत्ता जप्त होणार, कोण आहे भास्कर वाघ?

३४ वर्षांपूर्वी कोट्यवधींचा घोटाळा; अखेर सूत्रधाराची मालमत्ता जप्त होणार, कोण आहे भास्कर वाघ?

म. टा. वृत्तसेवा, धुळे : नव्वदच्या दशकात गाजलेल्या धुळे जिल्हा परिषदेतील निधी अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भास्कर वाघ याची मालमत्ता ३४ वर्षांनी सरकारजमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सर्वोच्च न्यायालयात अपील क्र. १५६५ /२००८ मध्ये पारित केलेले आदेश, विधी व न्याय विभाग व महसूल व वन विभागाने दिलेले अभिप्राय, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने भास्कर वाघ याच्याविरुद्ध मालमत्ता सरकारजमा करण्याची कार्यवाही धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. स्थावर मालमत्ता वगळता इतर जंगम मालमत्ताही ताब्यात घेण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

कोण आहे भास्कर वाघ?

भास्कर वाघ हा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचा रोखपाल होता. धनादेशावर कार्यकारी अभियंत्याची सही झाल्यावर तो धनादेशावरील रक्कम वाढवत असे. १९७५ ते ९० दरम्यान या पद्धतीने त्याने कोट्यवधी रुपयांचा अपहार केला होता. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनूकुमार श्रीवास्तव यांच्या कार्यकाळात हा अपहार समोर आला होता. या घोटाळ्यात ७७ आरोपींविरुद्ध १५ कोटी ८२ लाखांचा अपहार केल्याचे १४ गुन्हे नोंदवण्यात आले.

मालमत्तेचे मूल्य ११ लाख

जन्मठेपेची शिक्षा झालेला भास्कर वाघ अद्याप शिक्षा भोगत आहे. धुळे सत्र न्यायालयाच्या २००३ च्या निकालाविरोधात त्याने उच्च न्यायालयात दादही मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली. या निकालाविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात २००८ मध्ये दाद मागितली होती. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम केली. खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत वाघ याची संपत्ती जप्त करणे प्रलंबित होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाघ याच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले होते. ऑक्टोबर महिन्यात १७ लाख ३६ हजार रुपयांच्या दागिन्यांचा लिलाव झाला होता. १९९० मध्ये शासकीय निधी अपहार प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपीची मालमत्ता सरकारजमा होण्यास ३४ वर्षांचा कालावधी लागला.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत कोणता जिल्हा आघाडीवर? तुमच्या भागातील स्थिती काय? वाचा संपूर्ण लिस्ट

१९९० च्या दशकात राज्यभर गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद निधी अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भास्कर वाघ व त्याची पत्नी मंगला वाघ या दोघांची स्थावर व जंगम मालमत्ता लवकरच सरकारजमा होणार असल्याचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. कोट्यवधीच्या अपहार प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ याच्या मालमत्तेचे मूल्य ११ लाख ३९ हजार इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed