• Fri. Mar 20th, 2026

    Mumbai Crime : भांडुपमध्ये निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 39 लाखांचा गंडा; ‘पोलीस’ असल्याचं सांगत घरातच केलं ‘डिजिटल अरेस्ट’

    Mumbai Crime : भांडुपमध्ये निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला 39 लाखांचा गंडा; ‘पोलीस’ असल्याचं सांगत घरातच केलं ‘डिजिटल अरेस्ट’

    मुंबईत निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला सायबर भामट्यांनी ३९.६ लाखांचा चुना लावला आहे, ‘डिजिटल अरेस्ट’ आणि पोलीस असल्याचा बनाव करून लूटलं आहे. हा सर्व प्रकार भांडुपमध्ये घडला आहे.

    मुंबईत निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला सायबर भामट्यांनी ३९.६ लाखांचा चुना लावला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : सायबर भामट्यांनी आता ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली निवृत्त कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, भांडुपमध्ये एका निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला तब्बल ३९.६० लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत भामट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवले आणि या ज्येष्ठ नागरिकाची आयुष्यभराची कमाई लंपास केली. याप्रकरणी ईस्ट सायबर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस आता या टोळीचा छडा लावत आहेत.

    नेमकं प्रकरण काय?

    भांडुप पश्चिम येथे राहणारे दीपक मोंडकर हे २०१९ मध्ये बेस्ट सेवेतून निवृत्त झाले आहेत. या फसवणुकीची सुरुवात २९ जानेवारी रोजी एका फोन कॉलने झाली. ‘बिनी शर्मा’ नावाच्या एका महिलेने मोंडकर यांना फोन केला आणि सांगितले की, त्यांच्या नावाने काढलेले एक सिम कार्ड बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरले गेले आहे. इतकेच नाही तर यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याचेही तिने भासवले.त्यानंतर हा फोन ‘मनोज शिंदे’ नावाच्या व्यक्तीकडे सोपवण्यात आला, ज्याने स्वतःची ओळख मुंबई पोलीस अधिकारी म्हणून करून दिली. त्याने मोंडकर यांना मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात गोवण्याची भीती घातली. तपासाच्या नावाखाली त्याने मोंडकर यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची सर्व माहिती काढून घेतली.

    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात टिपू पठाण टोळीवर पुन्हा मोक्का; खंडणी रॅकेटचा पर्दाफाश, फरार ‘पच्चीस’ गजाआड

    ‘डिजिटल अरेस्ट’ आणि फसवणूक

    भामट्यांनी मोंडकर यांना इतके घाबरवले होते की, त्यांना घर सोडून कुठेही न जाण्याची ताकीद दिली होती. एका अर्थाने त्यांना घरातच ‘डिजिटल अटक’ करून ठेवण्यात आले होते. कायदेशीर कारवाईची भीती दाखवून सायबर भामट्यांनी त्यांना विविध खात्यांवर पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने मोंडकर यांच्याकडून ३९.६० लाख रुपये उकळले गेले.

    नंतर प्रकरण लक्षात आल्यानंतर मोंडकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर ईस्ट सायबर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

    Maharashtra TimesLPG Gas shortage : ‘वि’चित्रा’ ताई, 25 दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?’ रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात

    पोलिसांचे आवाहन

    सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फोन कॉल्सबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही पोलीस किंवा शासकीय यंत्रणा अशा प्रकारे फोनवरून बँक माहिती किंवा घरातील तपशील विचारत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा