नागपूर, दि. १७ : नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानरीक्षक यांच्यासह एनडीआरएफ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुर्घटना आणि मदतकार्याची माहिती घेतली. मदतकार्य वेगाने पूर्ण करण्यात यावे तसेच जखमींवर शासकीय खर्चाने योग्य उपचार करावे, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे तसेच स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या.
०००