• Mon. Nov 25th, 2024
    महापालिका कोणत्याही सुविधा पुरवत नाही, मग नांदेड सिटीला मिळकतकर का? राहिवाशांचा सवाल

    पुणे : स्वतंत्र टाउनशिप असलेल्या नांदेड सिटीमधील रहिवाशांना महापालिकेने मिळकतकराची देयके पाठविण्यास सुरुवात केली आहे. नांदेड गाव महापालिकेत आल्यापासून म्हणजेच २०२१ पासूनच्या कराची मागणी पालिकेने केली आहे. त्यामुळे नांदेड सिटीमधील रहिवाशांमध्ये मोठी अस्वस्थता असून, टाउनशिपमध्ये महापालिका कोणत्याही सुविधा पुरवत नसताना आम्ही मिळकतकर का भरायचा, असा सवाल रहिवासी उपस्थित करीत आहेत.

    आम्ही या प्रकल्पात घर घेताना ही टाउनशिप असल्याने एकरकमी देखभालशुल्क (वन टाइम मेंटेनन्स) भरल्यानंतर तुमच्याकडून मिळकतकर आकारला जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. वन टाइम मेंटेनन्सच्या रकमेतून नांदेड सिटी डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या खासगी कंपनीतर्फे नांदेड सिटीचे व्यवस्थापन केले जाते. नांदेड सिटीमध्ये महापालिका कोणतीही सुविधा पुरवत नाही. त्यामुळे आम्ही महापालिकेचा कर भरण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा येथील रहिवासी करीत आहेत.

    ‘इंडिया’ची पुन्हा एकजूट, १९ डिसेंबरला आघाडीची बैठक, पण केजरीवालांच्या टायमिंगची जोरदार चर्चा

    ‘नांदेड सिटीमधील नागरिक प्रीपेड मीटरद्वारे पाणी घेतात. आता पुणे महापालिका मिळकतकर देयकात पाणी व सांडपाणी शुद्धीकरणासाठीही कर आकारते आहे. म्हणजेच ही दुहेरी कर आकारणी होते. भारतीय घटनेनुसार दुहेरी कर आकारणी होऊ शकत नाही. येथील रस्ते, झाडणकाम, पथदिव्यांची व्यवस्थाही नांदेड सिटी कॉर्पोरेशनच पाहते. महापालिका एकही सुविधा देत नाही. येथे ‘पीएमपी’ बस सुविधाही नाही. जन्म-मृत्यू दाखल्यापासून अन्य सर्व सुविधा पालिका शुल्क आकारूनच पुरवते. ते सर्वांनाच भरावे लागते. मग टाउनशिपमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून मिळकतकर वसूल करण्याचे कारणच काय. ही येथील रहिवाशांची फसवणूक आहे,’ असे नांदेड सिटीमधील रहिवासी सोमनाथ म्हमाणे यांनी सांगितले.

    रहिवाशांचे म्हणणे…

    – मिळकतकर लागणार नाही, असा कंपनीचा दावा.

    – ग्रामपंचायतीने आमच्याकडून कर घेतला नव्हता.

    – आम्ही वन टाइम मेन्टेनन्स भरला आहे.

    – पालिकेकडून आम्हाला कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.

    – महापालिका विविध दाखले व अन्य सुविधा शुल्क आकारूनच पुरवते.

    – नांदेड सिटीमधील नागरिक प्रीपेड मीटरद्वारे पाणी घेतात.

    – महापालिका मिळकतकरात पाणी व सांडपाणी शुद्धीकरणासाठीही कर आकारते

    – भारतीय घटनेनुसार दुहेरी कर आकारणी होऊ शकत नाही

    पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगितली, पुणेकरांनी चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed