उन्हाळा, दिवाळी दहशतीतच
उपराजधानीत जेवढा उन्हाळा तापतो तेवढाच हिवाळाही गारेगार असतो. या दोन ऋतूंमध्ये शाळांना सुटी असल्याने अनेक जण मुलांसोबत बाहेरगावी जातात. दिवाळी हिवाळ्यात येते. याच काळात नागपुरात सर्वाधिक घरफोडी व चोरीच्या घटना घडतात. मे, जून, जुलै तसेच ऑक्टोबर, नोव्हेंबर हे महिने सर्वाधिक धोकादायक आहेत.घरात व घराबाहेर सीसीटीव्ही लावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. अनेकांनी ते लावलेही. पण, फायदा काय? चोरटे हुशार आहेत. आता घरफोडी करताना ते सीसीटीव्ही फोडून मौल्यवान वस्तूंसह चक्क सीसीटीव्हीचा डीव्हीआरही घेऊन जातात. चौका-चौकांत सीसीटीव्ही आहेत. पोलिसांची गस्त असते. पण, घरफोडीच्या घटना काही थांबलेल्या नाहीत.
लुटपाट आणि वाहनचोरींच्या घटनांतही वाढ
उपराजधानीत घरफोडींप्रमाणेच लुटपाट (जबरी चोरी) व वाहनचोरींच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. २०२२मध्ये १६७ जबरी चोरीच्या घटनांची नोंद झाली. यावर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत २२१ गुन्हे पोलिसदफ्तरी नोंदविण्यात आले. गेल्यावर्षी १,५५३ वाहनचोरीच्या घटना घडल्या घडल्या. यावर्षी आतापर्यंत १,६३८ वाहनचोरीचे गुन्हे दाखल झाले.गेल्या दहा महिन्यांत नागपूर आयुक्तालयांतर्गत आतापर्यंत ८३६ घरफोड्यांची नोंद झाली. त्यापैकी केवळ २२५ घरफोडी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. ही टक्केवारी ३० एवढी आहे.
उपराजधानीतील जबरी चोरी, घरफोड्या
२०२३ या वर्षात ३२६ (जबरी चोरी ) करण्यात आल्या तर ८३६ (घरफोडी) घटना घडल्या. तसेच १,६३८ (वाहनचोरी) घटना घडल्या आहेत
या पोलिस ठाण्यांच्या हद्दी कुख्यात
पोलिस आयुक्तालयांतर्गत येणारे हुडकेश्वर पोलिस ठाणे घरफोड्यांसाठी कुख्यात आहे. या पोलिस स्टेशनशिवाय बेलतरोडी, मानकापूर, कोराडी, कामठी, यशोधरानगर, कळमना, गिट्टीखदान, वाठोडा, अजनी व पारडी पोलिस स्टेशनही ‘हॉट’ आहे. उन्हाळ्यात व दिवाळीदरम्यान सर्वाधिक घरफोडीच्या घटना याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या भागात प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त होत नाही. याशिवाय निर्जन ठिकाणी घरे असल्याने घरफोडीच्या घटना घडतात.
टक्केवारीत नागपूर टॉप
राज्यातील मुंबई, पुण्यासह अन्य शहरांच्या तुलनेत दिवसा व रात्रीच्या घरफोडीच्या टक्केवारीतही नागपूर टॉप आहे. एनसीआरबीने गेल्यावर्षीची आकडेवारी जाहीर केली असून, यात हे धक्कादायक वास्तव आहे. गेल्यावर्षी उपराजधानीत सकाळी नागपुरात ११३, मुंबईत २४७ तर पुण्यात १४३ घरफोड्या झाल्या. नागपुरातील टक्केवारी सर्वाधिक ४.५ आहे. पुणे २.८ तर मुंबई १.३ इतकी आहे. रात्री होणाऱ्या घरफोडीत नागपुरात ६२० म्हणजे २४.८ टक्के, मुंबईत १,३८१ म्हणजे ७.५ टक्के व पुण्यातील ही संख्या ४७१ अर्थात ९.३ टक्के आहे.