मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बारामती येथील विमानतळावर आले असता यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांच्या आरोपांना फारसं महत्त्व न देता ते राज्य लेव्हलचे नेते नसल्याचं सांगून त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.
गौतम अदानी यांनी राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या खात्यावर दीडशे कोटी रुपये टाकले आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारण विरोध करणाऱ्यांची मालिका पाहिली तर ते केवळ मोघम आरोप करतात आणि जनतेच्या मनात संशय निर्माण करतात. मोघम नाव घेण्यापेक्षा त्या मंत्र्याचे नावच जाहीर करायला पाहिजे. नाव सांगण्यापासून त्यांना कोणी थांबवले आहे का,असा सवाल त्यांनी केला.
आदित्य ठाकरेंना सरकार गेल्याचं वैफल्य
भाजप विरोधात बोलले किंवा विरोधात काम केले तर भाजप त्याला बदनाम करते. तसेच ईडी, इन्कम टॅक्स मागे लावते, असा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, त्यांना सरकार गेल्याचे एक वैफल्य आहे. स्वतःचा पक्ष ते सांभाळू शकले नाहीत. त्याचे एक वैफल्य आहे. या वैफल्ल्यामधून त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. यातून ते असे वक्तव्य करत आहेत.
सद्यस्थितीत अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे चप्पल फेक झाली. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यातून असे प्रकार घडत चालले तर सद्यस्थितीत अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. भविष्यात अशा घटना घडू नयेत याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
उद्या सविस्तर भूमिका
आगामी काळात दादागिरीला दादागिरीने उत्तर दिले जाईल असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते.. यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वेळोवेळी सरकारची भूमिका मांडत आहेत. सध्या सभागृह सुरू आहे. उद्या त्याबद्दल आणखी काही भाष्य करू, असे विखे पाटील म्हणाले.