• Sat. Sep 21st, 2024

गावांतले ई-गव्हर्नन्स ‘दीड जीबी’च्या भरवशावर; ९३ टक्के ग्रामपंचायींमध्ये ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर जोडणी नाही

गावांतले ई-गव्हर्नन्स ‘दीड जीबी’च्या भरवशावर; ९३ टक्के ग्रामपंचायींमध्ये ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर जोडणी नाही

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड : डिजिटल इंडिया आणि ई-गव्हर्नन्स धोरणाचा शासन स्तरावरून नारा दिल्याने कार्यालयांमध्ये संगणकीय युग अवतरले असले तरी गावगाड्याचा कारभार मात्र अद्याप मोबाइलच्या ‘दीड जीबी’ डेटाच्या भरवशावर सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ९३ टक्के गावांमध्ये अद्याप इंटरनेटसाठी ब्रॉडबँड अथवा ऑप्टिक फायबर सुविधा न पोहचल्यामुळे त्यांना सर्व कामकाज मोबाइलच्या इंटरनेटचे ‘वायफाय’ अॅक्सेस घेऊन करावे लागत आहे. त्यामुळे देशातील संपूर्ण कारभार ऑनलाइन करून ई-गव्हर्नन्सचे स्वप्न कसे साकार होणार, हा प्रश्न आहे.

केंद्राच्या डिजिटल इंडिया धोरणामुळे शासकीय स्तरावरील सर्वच कामकाज ऑनलाइन स्वरूपात केले जात असून, सामान्य नागरिकांनाही विविध शासकीय योजनांचे लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कामकाज करावे लागत आहे. परिणामी, इंटरनेटचा वापर या ऑनलाइन कामांसाठी अपरिहार्य ठरत आहे. मात्र, जिल्ह्यातील १३८४ पैकी तब्बल १२८९ ग्रामपंचायतींमधील कामकाज मोबाइल इंटरनेटचा ‘वायफाय’ अॅक्सेस घेऊन केले जात असल्याचे जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील अवघ्या ५.५७ टक्के म्हणजेच ७७ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटसाठी ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध आहे. तर, ऑप्टिकल फायबर केबल जोडणी उपलब्ध असलेल्या अवघ्या १.३० टक्का म्हणजेच १८ ग्रामपंचायती जिल्ह्यात आहेत. निफाड तालुका ब्रॉडबँड आणि ऑप्टिकल फायबरच्या जोडणीत आघाडीवर असून, येथे २२ ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड तर १२ ग्रामपंचायतींत ऑप्टिकल फायबर जोडणी आहे. ८४ ठिकाणचा कारभार अद्याप मोबाइलवर आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती ऑनलाइन कामकाजाच्या दृष्टीने अधिक सक्षम करण्यासाठी तब्बल ९३.१३ टक्के ग्रामपंचायतींना अद्याप ब्रॉडबँड आणि ऑप्टिकल फायबर केबल जोडणीची प्रतीक्षा कायम आहे. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांतील सहभाग आणि इतर ऑनलाइन कामकाजासाठी कासवगतीने सुरू आलेल्या कामकाजाचा फटका सहन करावा लागत आहे.

पालकमंत्री, मंत्र्यांच्या मतदारसंघातच वानवा

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील एकाही ग्रामपंचायतीत आतापर्यंत ऑप्टिकल फायबर केबल जोडणी पोहचू शकलेली नाही. त्यांच्या मतदारसंघात अद्याप ब्रॉडबँड कनेक्शनही उपलब्ध नाही. या दोन्ही मंत्र्यांच्या मतदार संघांतील ग्रामपंचायातींत ऑनलाइन कामकाजासाठी मोबाइल वायफायद्वारेच इंटरनेटचा वापर होत असल्याचे चित्र आहे.

ब्रॉडबँड उपलब्ध नसलेले तालुके
येवला, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, नांदगाव, मालेगाव, कळवण, इगतपुरी आणि दिंडोरी
सुखदायक…मतदारांचा टक्का वाढणार; निवडणूक नोंदणीला नाशिककरांचा वाढता प्रतिसाद
ऑप्टिकल फायबर उपलब्ध नसलेले तालुके
चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि येवला

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे इंटरनेट जोडणी चित्र
तालुका—ब्रॉडबँड —मोबाइल वायफाय—ऑप्टिकल फायबर—एकूण ग्रामपंचायती
बागलाण—३—१२५—०—१३१
चांदवड—३—८७—०—९०
देवळा—४—३८—०—४२
दिंडोरी—०—१२१—०—१२१
इगतपुरी—०—९६—०—९६
कळवण—०—८६—०—८६
मालेगाव—०—१२५—०—१२५
नांदगाव—०—८६—२—८८
नाशिक—३३—३२—१—६६
निफाड—२२—८४—१२—११८
पेठ—१—७२—०—७३
सिन्नर—११—१०३—०—११४
सुरगाणा—०—६१—०—६१
त्र्यंबकेश्वर—०—८४—०—८४
येवला—०—८९—०—८९
एकूण—७७—१२८९—१८—१३८४

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये अद्याप ‘ओएफसी’ केबल जोडणी झालेली नाही. ज्या ग्रामपंचायतीत इंटरनेटसाठी मोबाइल वायफाय वापरात आहे, तेथे संबंधित कर्मचारी वैयक्तिक मोबाइलवरील इंटरनेट वापरतात.- वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जि. प.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed