पुण्यात झपाट्याने नागरीकरण वाढल्याने विजेच्या वाढत्या मागणीचे व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात ‘महावितरण’कडून वीजयंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येत आहे. पुण्यासह राज्यातील वीजग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी आणि वीजगळती रोखण्यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने हे मीटर कार्यान्वित होणार असून, ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीजवापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार मिळणार आहे.
स्मार्ट मीटरची निविदा पूर्ण
नवीन स्मार्ट मीटर लावण्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार राज्यातील दोन कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार आहेत. त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. यामध्ये पुणे परिमंडल अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह वेल्हे, हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यांमध्ये सुमारे २९ लाख प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत, असे ‘महावितरण’तर्फे सांगण्यात आले.
प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत
‘महावितरण’च्या ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट वीजमीटर मोफत मिळणार असून, त्याचा खर्च केंद्र सरकारच्या अनुदानातून आणि ‘महावितरण’कडून केला जाणार आहे.
आर्थिक नियोजन करणे शक्य
सध्याच्या वीजमीटरमध्ये ग्राहकांच्या वीजवापराची नोंद असते. दर महा त्याचे रीडिंगही घेतले जाते, त्यानुसार वीजबिल पाठविले जाते. एखाद्या ग्राहकाने जास्त वीज वापरली, तर बिल अधिक येते. त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते. वीज वापरल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीज ग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरू शकतात. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नियोजन करून विजेवरील खर्च नियंत्रणात ठेवता येईल.
घरबसल्या करा रिचार्ज
प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. मात्र, ग्राहकांना मोबाइलवर वीजवापराची माहिती मिळणार असल्याने शिल्लक किती उरली आहे, हे समजल्याने नव्याने रिचार्ज करणे सुलभ होईल. घरबसल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंटचीही सुविधा मिळणार आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाइलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘रात्री वीज खंडित होणार नाही’
एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले, तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले, तरी वीजपुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत रक्कम भरून वीजपुरवठा चालू ठेवायचा आणि रक्कम संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे बिल वजा होईल, अशी सुविधा प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये असल्याचे ‘महावितरण’ने सांगितले.