‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ने (पीएमपी) बसच्या जलद वाहतुकीसाठी शहरात सन २००७ मध्ये हडपसर-स्वारगेट-कात्रज या मार्गावर पथदर्शी ‘बीआरटी’ सुरू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ‘बीआरटी’ मार्ग वाढविण्यात आले. पुण्यात संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते वाघोली (आपल घर) या मार्गावर ‘बीआरटी’ सुरू झाली. पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ‘बीआरटी’ राबविण्यास सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवातीपासूनच ‘बीआरटी’च्या अंमलबजावणीकडे व्यवस्थित लक्ष दिले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या एकूण आठ ‘बीआरटी’ मार्ग असून, हे अंतर ६९.५ किलोमीटर आहे. ‘बीआरटी’ मार्गांतून दररोज साधारणत: ८०० बस धावतात. याद्वारे साधारण सहा लाख प्रवासी प्रवास करतात. एकूण ‘बीआरटी’ मार्गांपैकी पाच मार्ग पिंपरीत असून, तीन मार्ग पुण्यात आहेत. पिंपरीत एकूण ५० किलोमीटरची ‘बीआरटी’ सुरू आहे. पुण्यात केवळ १७ किलोमीटरवर ‘बीआरटी’ धावत आहे. त्यातही फक्त एकाच मार्गावर पूर्ण क्षमतेने ही सेवा सुरू आहे. पिंपरी पालिकेकडून ‘बीआरटी’ वाढविण्यासाठी ती सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या हद्दीत ‘बीआरटी’चे मार्ग वाढत आहेत. दुसरीकडे पुणे महापालिका ‘बीआरटी’वर लक्ष देण्याऐवजी ती हटविण्याच्या मागे लागली आहे. त्याचा फटका प्रवाशांबरोबरच ‘पीएमपी’लाही बसत आहे.
ऑक्टोबरमधील एका दिवसाची ‘बीआरटी’ची स्थिती
मार्ग अंतर (किमी) बसच्या फेऱ्या प्रवासी उत्पन्न (~)
नाशिक फाटा ते वाकड आठ १४८ १३,८०२ १,९८,३३१
निगडी ते दापोडी १२ २१०९ १,२५,५१० २,३७,९५८
संगमवाडी ते विश्रांतवाडी नऊ ५६४ ३२,००१ ४,८३,५६४
सांगवी फाटा ते किवळे १४.५ १११० ७८,२६४ १३,०५,०२५
येरवडा ते आपले घर सात १९९० १,०८,१३८ १८,४७,८४६
काळेवाडीफाटा ते चिखली १०.५ ३९८ २६,०८५ ३,४८,७८७
स्वारगेट ते कात्रज सहा २,०८१ १,३०,७८६ १६,७३,५८१
दिघी ते आळंदी ५.५ १,१९५ ७९,०९४ १३,१६,७३६
एकूण ६९.५ ९,५९५ ५,९३,६८० ९२,११,८२९