म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील पिंपरी तळवडे येथील आगीत पत्नी आणि मुलगी गंभीर भाजल्याचे निगडी येथील गणेश बळीराम राठोड यांना समजताच त्यांनी ताबडतोब ससून रुग्णालय गाठले. पत्नीला आणि मुलीला पाहण्यासाठी त्यांची रुग्णालयामध्ये धावपळ सुरू होती. मात्र, जळीत विभागामध्ये कोणलाही जाण्याची परवानगी नसल्याने त्यांना बाहेर थांबावे लागले. पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याचे समजताच त्यांनी हंबरडा फोडला. गणेश यांच्याप्रमाणे अनेकांच्या जीवाची अशीच घालमेल ‘ससून’मध्ये शुक्रवारी सुरू असल्याचे दिसून आले.
राठोड कुटुंबीय मूळचे विदर्भातील असून, ते रोजगारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गणेश राठोड बांधकाम क्षेत्रात कामाला आहेत. तळवडे येथे आग लागलेल्या कारखान्यात त्यांची पत्नी कविता आणि मुलगी शिल्पा कामाला आहेत. या दोघीही आगीत गंभीर जखमी झाल्या. या घटनेने राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीला दुसऱ्या वॉर्डमध्ये नेताना गणेश यांनी पाहिले आणि त्यांनी हंबरडा फोडला.

‘पत्नी आणि मुलीला तीनशे रुपये रोजगार होता. मुलीचे लग्न झाले होते. मात्र, दीड वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे ती माहेरी राहते. पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्याने मी आता कसे जगू,’ असे बोलून गणेश राठोड यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ‘ससून’चे आवार स्तब्ध झाले.