निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून, लिलाव बंद पाडण्यासह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येवल्यातील नगर-मनमाड महामार्ग ठप्प!
येवला: कांदा निर्यात बंदीच्या विरोधात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. व्यापाऱ्यांनी शुक्रवारच्या लिलावाकडे पाठ फिरवल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात कांदा विक्रीसाठी आलेल्या कांदा उत्पादकांची घोर निराशा झाली. बाजार समितीत जवळपास ३५० ट्रॅक्टरद्वारे आवक झाली होती. कांदा लिलाव होत नसल्याने अनेक तास प्रतीक्षा केलेल्या शेतकऱ्यांनी अचानकपणे बाजार समिती समोरील मनमाड-नगर राज्य महामार्गावर अचानक रास्ता रोको केला.
यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकरी संकटात सापडला असतानाच गेल्या आठ महिन्यातील पूर्वीचे तब्बल सहा महिने कांदा उत्पादकांना कवडीमोल बाजारभावामुळे मोठ्या आर्थिक संकटात टाकले होते. कांदा बाजार भावाबाबत प्रारंभीचे सहा महिने कमालीचे निराशाजनक ठरल्यानंतर गेल्या दोन महिन्यात थोड्याफार उंचावलेल्या बाजारभावाने उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा दिला. अशातच आता केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने उत्पादकांसह व्यापाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. निर्यात बंदीमुळे अगोदर खरेदी केलेला कांदा कसा निर्यात करावा? अशी धास्ती घेतलेल्या व्यापाऱ्यांनी शुक्रवारी लिलावाकडे पाठ फिरवली. त्यामुळे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे जवळपास ३५० ट्रॅक्टर उभे होते. अनेक तास प्रतीक्षा करून देखील कांदा लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील महामार्गाकडे आपला मोर्चा वळवत रस्त्यावर जवळपास अर्धा तास ठिय्या दिला. आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे आदी सहभागी झाले होते. येवला शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली.
माल परत नेण्याची वेळ
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्यासह नव्याने दाखल झालेल्या पोळ लाल कांद्याचे जवळपास साडेतीनशे ट्रॅक्टर शुक्रवारी लिलावासाठी दाखल झाले होते. मात्र कांदा निर्यात बंदीमुळे व्यापाऱ्यांनी लिलाव बंदीचे हत्यार उपसले अन् कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. दुपारपर्यंत कांदा लिलावाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेर कांदा लिलाव होणार नसल्याचे लक्षात घेऊन बाजार समितीत आणलेले आपले ट्रॅक्टर पुन्हा घराच्या दिशेने वळवले.
चांदवडला संतप्त शेतकऱ्यांनी रोखला मुंबई-आग्रा महामार्ग
चांदवड : केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व शेतकरी आंदोलकांमध्ये रास्ता रोको वरून मतभेद झालेत. यावेळी शेतकरी रास्ता रोकोवर ठाम राहिल्याने आंदोलक व पोलिस यांच्यात धुमश्चक्री झाली साधारणतः एक तासाच्या गदारोळानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत वाहनांसाठी महामार्ग मोकळा करून दिला तसेच यावेळी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने मनमाड येथून दंगा नियंत्रण पथकाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले, त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, हे पथक दिवसभर बंदोबस्तासाठी कायम ठेवण्यात आले होते.
आंदोलन टप्प्याटप्प्याने…
१. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या कांदा लिलावात व्यापाऱ्यांनी सुरुवातीस हजार बाराशे रुपये कांदा बाजारभाव पुकारले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ कांदा लिलाव बंद पाडला. तसेच सरकारविरोधी घोषणा देत बाजार समितीतून मुंबई-आग्रा महामार्गावर जाऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारी हेच भाव साडेतीन ते चार हजार रुपयांच्या आसपास होते.
२. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, बाजार समिती सभापती संजय जाधव, प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, उपसभापती कारभारी आहेर, संचालक नितीन आहेर, दत्तात्रय वाघचौरे आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, आंदोलनानंतर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले, याबाबत समितीत लिलावासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याची सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांची माहिती दिली.
३. आंदोलकांकडून तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निर्यातबंदी धोरणाविरोधात निवेदन देण्यात आले. तसेच माजी आमदार कोतवाल यांनी यांनी आंदोलकांना पोलिस ठाण्यात जाऊन सर्वांनी अटक करून घेण्याचे आवाहन केले.
४. काही आंदोलक पोलिस स्टेशनकडे निघालेत, मात्र काही शेतकऱ्यांनी रस्त्यावरच आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने काही काळ पोलिस प्रशासन व शेतकरी आंदोलकामध्ये तणाव निर्माण झाला. आंदोलनात अनिल पाटील, दिपांशू जाधव, नितीन थोरे, अॅड. नवनाथ आहेर, अॅड. सुदर्शन पानसरे आदींसह राजकीय पदाधिकारी तसेच असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
चांदवड
– आंदोलकांनी सुमारे दोन तास महामार्ग रोखल्याने मुंबई-आग्रा तसेच लासलगाव-मनमाड महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या
– आंदोलनातील गदारोळादरम्यान सर्व्हिस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान
– गोंधळाच्या परिस्थितीदरम्यान शाळा, महाविद्यालये सुटल्याने आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची गर्दी
– तणावपूर्ण परिस्थिती असतानादेखील शेतकरी आंदोलकांकडून रुग्णवाहिकेला जागा करून देत घडविले माणुसकीचे दर्शन
– कांद्यावर लादलेला अन्यायकारक निर्यातबंदीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून जनआंदोलनाचा इशारा