• Mon. Nov 11th, 2024
    नवाब मलिक महायुतीत नको, आमचा तीव्र विरोध, देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवार यांना पत्र

    नागपूर : राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिकांवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटाला म्हणजेच महायुतीला पाठिंबा असल्याची भूमिका स्पष्ट केली. मात्र दुसरीकडे नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात घेण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप आहे. सत्ता येते-जाते, आपल्याला देश महत्त्वाचा, नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नाही, अशा आशयाचं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे.

    महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्यावरून भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन पक्षांमध्ये जोरदार वाकयुद्ध झालं. ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप केले, त्यांनीच आता सरकारला पाठिंबा दिलाय? हा पाठिंबा तुम्हाला कसा काय चालतो? असे सवाल उपस्थित करून ठाकरे गटाने भाजपची कोंडी केली. त्यानंतर काहीच तासांत देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको, अशी भूमिका मांडली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

    माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार मुद्धा आहे, त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता किंवा वैयक्तिक आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य उरणार नाही, असे आमचे मत आहे.

    सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत, त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षांना करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

    त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणान्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचाराशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed