कल्याण, मुरबाड तालुक्यांच्या आणि बदलापूर शहराच्या वेशीवरील अनेक गावांतील नागरिक रेल्वे प्रवासासाठी बदलापूर रेल्वे स्थानकाचा वापर करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना रोज आपले घर गाठण्यासाठी बदलापूर शहरातील एरंजाड ते वालिवली या मार्गाने प्रवास करावा लागतो. तसेच मुरबाड आणि कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी बदलापूर शहराच्या बाह्य भागातून वालिवलीमार्गे प्रवास सोयीचा ठरतो. यासाठी उल्हास नदीवरील वलिवली पूल नागरिकांना ओलांडावा लागत असतो. त्यामुळे कोंडीमुक्त आणि वेळेची बचत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या पुलाचा वापर करतात.
मात्र, गेल्या काही वर्षांत वालिवली पुलाची दुरवस्था झाल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या पुलाच्या डागडुजीची मागणी करण्यात येत होती. अखेर वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या पुलाची देखभालदुरुस्ती करण्याचा निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आज ७ डिसेंबरपासून या पुलाची देखभाल, दुरुस्ती, फुटपाथ आणि पुराच्या आरसीसी संरचना सुधारणा तसेच पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे.
४४ वर्षांपूर्वी पुलाची उभारणी
देखभाल दुरुस्तीसाठी अंदाजे सहा कोटींचा खर्च
पुढील ३४ दिवस पुलावरची वाहतूक बंद राहणार
वाहन चालकांना, बदलापूर गाव, समर्थ चौक, रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवास करावा लागणार
वालिवलीहून एरंजाडकडे जाणाऱ्या वाहनांना वडवली गणेश चौक, मांजरी हेंद्रेपाडाहून बॅरेज चौकाकडे जाता येणार आहे.