• Sat. Sep 21st, 2024
तटकरे-अजितदादा साथ साथ… नवाब मलिकांप्रश्नी विरोध करणाऱ्या फडणवीसांना ट्विटमधून उत्तर

मुंबई : ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले, ते नवाब मलिक आज सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेत, असा आक्षेप शिवसेना ठाकरे गटाने घेतल्यावर पुढच्या काही तासांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको, अशी आक्रमक भूमिका घेतली. सत्ता येते आणि जाते पण देश महत्त्वाचा असतो. ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत, त्यांना महायुतीत घेण्याला देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. फडणवीस यांच्या पत्रानंतर अजित पवार गट काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर अजित पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट करून फडणवीस यांना ट्विटरवरून उत्तर दिलंय.

“नवाब मलिक यांच्याशी आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे”, असं ट्विट अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केलंय.

सत्ता येते-जाते, आपल्याला देश महत्त्वाचा, नवाब मलिक महायुतीत नको, फडणवीस यांचं अजित पवार यांना पत्र
एकंदरित नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिलेला नाही पर्यायाने महायुतीला पाठिंबा देण्याविषयी कोणतीही अधिकृत भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाही, असेच तटकरे यांनी या ट्विटमधून सुचवले आहे. महत्त्वाचं म्हणजे हेच ट्विट अजित पवार यांनी रिट्विट करून त्यांचंही हेच म्हणणं असल्याचं एकप्रकारे सांगितलं आहे.

मलिकांवर आरोप म्हणून महायुतीत नको, मग अजितदादांवरही आरोप, त्यांचा पाठिंबा घेताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? : अंधारे
सुनील तटकरे काय म्हणाले?

आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे.

अजितदादा सत्तेत नको हे भाजपच्या कोणत्या नेत्याला पत्र लिहून सांगणार? अंधारेंचा फडणवीसांना थेट सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed