• Sat. Sep 21st, 2024

चंद्रपूरातील प्रमुख नद्या सर्वाधिक प्रदूषित; आरोग्यावर परिणाम, कृती आराखडा अद्यापही कागदावरच

चंद्रपूरातील प्रमुख नद्या सर्वाधिक प्रदूषित; आरोग्यावर परिणाम, कृती आराखडा अद्यापही कागदावरच

म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांचे प्रदूषण दशकापासून वाढतेच असून शहराजवळून वाहणाऱ्या झरपट आणि इरई नद्यांच्या आणि अतिशय प्रदूषित रामाळा तलावामुळे शहराचे भूजल प्रदूषित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी नदी, तलाव संकटात सापडली असून या प्रदूषणामुळे रोगराईत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.

– २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नद्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर देशातील सर्वाधिक ५५ नद्या प्रदूषित आढळल्या होत्या. त्यात वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा या नद्या २०१४ पासून प्रदूषित जाहीर झाल्या.

– २०२३ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जल सीइपीआय (व्यापक पर्यावरण प्रदूषण सूचकांक) ५९.३ हा गेल्या १५ वर्षांत सर्वाधिक प्रदूषित म्हणून जाहीर झाला आहे.

– याही पेक्षा गंभीर स्थिती इरई आणि झरपट नद्यांची आहे. या नद्यांसाठी फक्त एकदाच १० वर्षांपूर्वी अॅक्शन प्लान तयार झाला. यानंतर दोन कृती आराखडे तयार झाले. मात्र समस्या आजही कायम असल्याचे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

– २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्धा नदीचे पात्र पुलगाव ते राजुरापर्यंत प्रदूषित मानले गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस ते राजुरा पर्यंतचे ४२ किमी पात्र हे प्रदूषितश्रेणी ३ मध्ये समाविष्ट आहे.

– या प्रदूषणाला वरोरा, भद्रावती, राजुरा, बल्लारशा आणि चंद्रपूर शहरातील सांडपाणी, वेकोलीच्या खाणी आणि जवळ जवळ ४० उद्योगातून काही प्रमाणांत होणारा विसर्ग कारणीभूत आहे.

– चंद्रपूर शहरातून दररोज १७२.५ च्या दरम्यान मेट्रिक टन घनकचरा निघतो, त्यातून ४२.२ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. बल्लारपूर मधून २५-३० मेट्रिक टन घनकचरा निघतो आणि २० टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.

– राजुरा, भद्रावती, वरोरा येथून जवळ जवळ २५ मेट्रिक टन कचरा निघतो आणि १५ टनाची विल्हेवाट लावली जाते.

– चंद्रपूर जिल्ह्यात धोकादायक कचरा निर्माण करणारे ९९ उद्योग आहेत, त्यातून ७६६ मेट्रिक टन कचरा निघतो.

– यातील बहुतेक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते परंतु काही पाण्यावाटे नदीत जातो. त्यामुळे वर्धा नदीत नाल्यावाटे कचरा जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे प्रा.चोपणे यांनी नमूद केले.

– सांडपाणीयुक्त पाणी आणि इतर जल प्रदूषणाचे अनेक गंभीर परिणाम होतात. जास्त गाळ आणि खनिजे असलेल्या पाण्यामुळे किडनीत आणि पित्ताशयात खडे,रसायनामुळे रक्त आणि अवयवात बिघाड, रोगजंतुमुळे कॉलरा, डायरिया, डीसेंट्री, हिपाटीसीस, टायफोईड, गेस्ट्रो, कावीळ तसेच जीवाणू-विषाणूचे इतर आजार होतात.
महाराष्ट्रातील नद्यांबाबत चिंताजनक माहिती; प्रदूषणात देशात पहिला नंबर, सर्वात प्रदुषित नदी कोणती?
कृती आराखड्यातील सूचना

– पालिकांसाठी आणि नदी तीरावरील गावांसाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा सुरू करणे
– नदीत आंघोळ न करणे, सक्षम घनकचरा व्यवस्थापन
– नाल्याचे दूषित पाणी नदीत न येण्यासाठी उपाययोजना करणे
– जनजागरण मोहीम राबविणे
– वर्धा नदीच्या दोन्ही तीरावर वन विभागाने वृक्षारोपण करणे
– जैवविविधता उद्यान निर्मितीसह विविध उपाययोजना करणे

पैनगंगा-वैनगंगा प्रदूषण

चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम-दक्षिण सीमेवरून पैनगंगा नदी वाहते आणि ती वढा येथे वर्धेला मिळते. वर्गवारी ४ मध्ये मोडणारी ही नदी जरी मेहकर-उमरखेड येथे जास्त प्रदूषित दाखविण्यात आली असली तरी वढा येथे घेतलेल्या नमुन्यात ती प्रदूषित दाखविण्यात आली आहे. वैनगंगा नदी चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व-उत्तर दिशेला वाहत असून ती वर्ग ३ मध्ये तुमसर ते अंभोरा पट्ट्यात प्रदूषित दाखविण्यात आली आहे. परंतु तरीही ती चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर कमी अधिक प्रमाणात प्रदूषित आहे. त्यामुळे या नद्यांनासुद्धा हाच अॅक्शन प्लान लागू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed