महिलेला पाच स्टेंट बसवण्यात आले आहेत, तिची सहा वेळा अँजिओप्लास्टी झाली आहे, तर एकदा हृदयाची बायपास शस्त्रक्रियाही झाली आहे.
मुंबईतील मुलुंड भागात राहणाऱ्या ५१ वर्षीय रेखा (नाव बदलले आहे) म्हणतात, की मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की माझ्याबाबत काय चुकतंय? आणि पुढील तीन महिन्यांत माझ्या रक्तवाहिन्यात पुन्हा ब्लॉकेज निर्माण होतील की नाही.”
सप्टेंबर २०२२ मध्ये जयपूरहून ट्रेनने बोरिवली निघाले असताना रेखा यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यावेळी त्यांना अहमदाबादमधील सरकारी रुग्णालयात नेले होते. पण आम्ही अँजिओप्लास्टीसाठी मुंबईला जाणे पसंत केले, असं मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रेखा यांनी सांगितले.
“रेखा यांच्या हृदयातील समस्येचं कारण एक गूढच आहे” असं हृदयरोगतज्ज्ञ डॉ हसमुख रावत म्हणाले. त्यांनी रेखा यांच्यावर दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया केली असून जुलै महिन्यापासून तिच्यावर देखरेख करत आहेत.
रेखा यांनी सल्ला घेतलेल्या अनेक डॉक्टरांसह तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की व्हॅस्क्युलायटिससारख्या स्वयं-प्रतिकारक रोगात रक्तवाहिन्या फुगतात आणि अरुंद होतात, परंतु चाचण्यांमध्ये अद्याप कोणतेही स्पष्ट निदान झालेले नाही.
काही महिन्यांच्या अंतराने हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे परत येतात, जसं की छातीत तीक्ष्ण वेदना, ढेकर आणि अस्वस्थता.
मला फेब्रुवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये हार्ट अटॅक आला आहे, असं रेखा म्हणाल्या. एकदा तर झटक्यांनतर भीतीने मी रुग्णालयात धाव घेतली होती, असंही त्यांनी सांगितलं.
रेखा यांना मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यांसारख्या दीर्घकालीन समस्या आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांचे वजन १०७ किलो होते. तेव्हापासून त्यांनी ३० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आहे. त्यांना ‘PCSK9 इनहिबिटर’ चे इंजेक्शन देण्यात आले आहे. हे कोलेस्टेरॉल कमी करणारे तुलनेने नवीन औषध आहे, ज्यामुळे त्यांची कोलेस्टेरॉल पातळी कमीही झाली आहे आणि त्यांची शुगर देखील नियंत्रणात आहे, परंतु हृदयविकाराचे झटके सुरूच आहेत.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News