• Mon. Nov 25th, 2024

    प्राचार्यांच्या ‘त्या’ परिपत्रकाची दखल; महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून चौकशी समिती नियुक्त

    प्राचार्यांच्या ‘त्या’ परिपत्रकाची दखल; महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून चौकशी समिती नियुक्त

    म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी : येथील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित राहण्याची सक्ती करून हॉलतिकीट न देता, परीक्षेला न बसू देण्याचा गर्भित इशारा देणारे पत्रक थेट प्राचार्यांनीच काढल्याने मोठी खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घेतली आहे. या सगळ्या प्रकारची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. १ डिसेंबर रोजी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने विषय समोर आणला होता.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर होते. याच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता प्राचार्यांनी हे परिपत्रक काढल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी युवक तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी केला होता. सावंत यांनी या प्रकाराची माहिती त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून देताना परिपत्रकासह काही छायाचित्रेही पोस्ट केली होती. या प्रकाराची दखल शिवसेनानेते आदित्य ठाकरे यांनी घेतली व शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे यांनी याबाबतची लेखी तक्रार १ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण तंत्र मंडळाचे संचालक प्रमोद नाईक यांच्याकडे केली.
    आरोग्य खात्यात प्रचंड भ्रष्टाचार, माझ्याकडे पुरावे, जबाबदार व्यक्तीचे नाव कळवा, त्याच्याकडे पुरावे देतो : राऊत
    दुर्गे यांनी केलेल्या तक्रारीत, लोटे एमआयडीसी येथील शासकीय कार्यक्रमाला गर्दी व्हावी या हेतूने करण्यात आलेला हा संतापजनक प्रकार असल्याचे म्हटले आहे. आपल्या वर्ग खोल्यात सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित न झाल्यास हॉलतिकीट तसेच परीक्षेला बसू न देण्याबाबत पत्रक काढणे, हा प्रकार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या कार्यकाळातील अत्यंत दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय व शैक्षणिक हक्कांवर गदा आणणारा आहे. विद्यार्थ्यांच्या आणि राज्याच्या एकंदरीत शैक्षणिक वातावरणासाठी अशा घटना या अत्यंत क्लेशदायी आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी रत्नागिरी पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांची चौकशी करावी, अशी मागणी या तक्रारीत केली होती. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पॉलिटेक्निकमधील प्राचार्य व दोन सदस्यांची नियुक्ती चौकशी समितीमध्ये करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *