• Sat. Sep 21st, 2024

सातबारा उताऱ्याबाबत मोठी अपडेट; आता नागरिकांचा वेळ अन् पैसेही वाचणार, कसे ते वाचा

सातबारा उताऱ्याबाबत मोठी अपडेट; आता नागरिकांचा वेळ अन् पैसेही वाचणार, कसे ते वाचा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सातबारा, ‘आठ अ’ उतारा मिळविण्यासाठी आता तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. आता अवघ्या २५ रुपयांत ‘महा ई-सेवा’ केंद्रात एका ‘क्लिक’वर सातबारा; तसेच ‘आठ-अ’चा उतारा काढता येणार आहे. ‘महा ई-सेवा’, ‘सेतू’; तसेच ‘आपले सरकार’ या पोर्टलवर हा महत्त्वाचा दस्तऐवज उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार आहे.

आता ई-सेवा केंद्रातून सेवा

जमिनविषयक विविध कागदपत्रांसाठी सामान्यांना ग्रामपंचायत कार्यालयातील तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागतात. तलाठी विविध कामांसाठी कार्यालयाबाहेर असल्यास नागरिकांना त्याची वाट पाहात बसावे लागायचे. तलाठ्यांकडून वेळेत काम होत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे महसूल विभागाच्या सेवा लोकाभिमुख व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने फेरफारविषयक सेवा आता ‘महा-ई-सेवा’, ‘सेतू’; तसेच ‘आपले सरकार’ यांसारख्या केंद्रांमधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आठ अ’ उताराही २५ रुपयांत

– सातबारा उतारा, ‘आठ अ’सारखे दैनंदिन कामकाजात लागणारे उतारे काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
– महा ई-सेवा केंद्रामधून हे उतारे केवळ २५ रुपयांत उपलब्ध होणार आहेत.
– त्यामुळे सामान्यांची कामे लवकर होण्यास मदत होणार आहे.
– परिणामी, त्यांचा वेळ, पैसा वाचणार आहे.
ससून रुग्णालयाबाबत मोठी अपडेट; दीड वर्षापासून बंद सिस्टीम पुन्हा होणार सुरु, रुग्णांना मिळणार दिलासा
ई-हक्क प्रणालीचा उपयोग

फेरफारविषयाच्या ज्या नोंदी नोंदणीकृत दस्ताद्वारे होत नाहीत. त्या अर्जाद्वारे दाखल करता येतात. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ई-हक्क प्रणाली आता सुरू केली आहे. त्यानुसार वारसनोंदी करणे, मृताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे किंवा कमी करणे अशा स्वरूपाच्या कामांसाठी तलाठी कार्यालयात अर्ज देऊन नोंदी कराव्या लागतात. मात्र, आता ही कामे महा ई-सेवा केंद्रांतून करता येणार आहेत. सेवा केंद्रांमधून अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे ‘स्कॅन’ करून ‘अपलोड’ करणे यासाठी केवळ २५ रुपये खर्च येणार आहे.

फेरफारविषयक सर्व सेवा आता महा ई-सेवा, आपले सरकार या केंद्रांतून उपलब्ध करण्यात येणार आहे. ई-हक्क प्रणालीत अर्ज करताना अर्जदारांनी स्वतःचा मोबाइल क्रमांक द्यावा. त्यामुळे त्या संदर्भातील ‘अपडेट एसएमएस’द्वारे अर्जदारांना मिळू शकतील.- सरिता नारके, राज्य संचालक, माहिती व तंत्रज्ञान, महसूल विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed