पांढऱ्या रंगाचा नाग पहिल्यांदाच सापडल्याने त्याची माहिती मिळवण्यासाठी सर्पमित्र बडोदे यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना या नागाचे छायाचित्र पाठवले. यावेळी राहुल शिंदे यांनी छायाचित्राचे निरीक्षण करून मुंगसाने नागाचे तोंड फाडल्याचा अंदाज वर्तवला. मुंगूसाच्या हल्ल्यामुळे नागाची शिकार करण्याची क्षमता कमी झाली असावी अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. मुंगूस व नागामध्ये द्वंद झाले असावे आणि नाग मुंगूसाच्या तावडीतून सुटलेला असावा. त्यामुळे नागाच्या तोंडाला जखम झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
अशक्तपणामुळे नागाला शिकार करता येत नसावी. त्यामुळे अपुऱ्या पोषणामुळे त्याच्या शरीरातील ‘मेलनीन’चे प्रमाण कमी होऊन त्याच्या त्वचेचा मूळ रंग जाऊन त्याठिकाणी पांढरा रंग येत असावा किंवा तो पूर्वीपासूनच ‘लुसिस्टिक’ म्हणजे पांढरा असावा आणि त्याच्या शरीराला आलेल्या पांढऱ्या रंगामुळे तो मुंगूसाच्या नजरेस सहजरित्या पडला असावा आणि त्याच्यासोबतच्या संघर्षात जखमी झाला असावा, असा अंदाज आहे.
नागाच्या शरीरावर आलेल्या पांढऱ्या रंगामुळे हा ‘लुसिस्टिक’ होत असून या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत ‘ल्युसिझम’ म्हणतात. ‘ल्युसिझम’ म्हणजे रंगद्रव्य हस्तांतरणातील दोषामुळे ‘मेलेनीन’चे आंशिक अथवा पूर्ण नुकसान झाल्याने रंगद्रव्य कमी होते. त्वचा रंगहीन होते अथवा तिथे पांढरा रंग येतो. नागाच्या तोंडाचा भाग पूर्णपणे पांढरा पडला असून शरीराच्या काही भागांवरील त्वचा पांढरी झाली आहे, असे राहुल शिंदे यांनी सांगितले. बडोदे यांनी नागाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेऊन उपचार केले. नांदगाव वनविभागात नोंद करून नागाला तत्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.