• Sat. Sep 21st, 2024

जळगावात प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी; पहिल्याच दिवशी वाहतुकीची झाली मोठी कोंडी

जळगावात प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी; पहिल्याच दिवशी वाहतुकीची झाली मोठी कोंडी

जळगाव: विश्‍वप्रसिध्द प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या बडे जटाधारी मंदिर परिसरात आजपासून सुरू झालेल्या शिव महापुराण कथेला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली असून हजारो भाविक यात अडकून पडल्याचे वृत्त आहे.

पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्याच कथेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. जळगाव तालुक्यातील बडे जटाधारी मंदिर परिसरातील भव्य मंडपात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथा सुरू झाली, तेव्हा उपस्थित लक्षावधी आबालवृध्द भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी मंगळवारीच्या निरूपणात शिव महापुराण कथेची प्रस्तावना करतांनाच काही भक्तांचे अनुभव हे त्यांनी पाठविलेल्या पत्रांचे वाचन करून सांगितले.यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या पत्रांनाच त्यांनी स्थान दिले.कथेच्या पहिल्या दिवशीच मंडप अपूर्ण पडल्यामुळे असंख्य भाविकांनी बाहेर बसूनच कथेचे श्रवण केले.

सायंकाळी बरोबर पाच वाजता कथेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. शेवटी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह कथेचे आयोजक भरत चौधरी, जगदीश चौधरी व तुषार चौधरी तसेच मोजक्या मान्यवरांना व्यासपीठावर निमंत्रीत करून आरती करण्यात आली. यानंतर कथेसाठी आलेले भाविक कथा स्थळावरून निघाले.

दरम्यान, आरती होण्याआधीच अनेक भाविकांनी मंडप सोडून बाहेर प्रयाण केले.तरीही वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेष करून आव्हाणे फाटा मार्गाने जळगावकडे येणार्‍या बसेस तसेच अन्य वाहनांमुळे अक्षरश: हा रस्ता गच्च भरून गेल्याचे वृत्त आहे. अनेक बसेस तीन ते चार तासांपासून एकाच ठिकाणी उभ्या असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशीरापर्यंत वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

शिव महापुराण कथेला पाच लाखांपेक्षा जास्त भाविक येतील अशी अपेक्षा असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले होते. पोलीसांनी वाहतूक सुरळीत रहावी यासाठी चार मार्गांनी येण्या-जाण्याचे नियोजन केले असले तरी पहिल्याच दिवशी भाविकांची अतिरिक्त गर्दी आल्यामुळे नियोजन कोलमडून पडल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed