बीड जिल्ह्यातील परळी येथील ओपळे मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, आमदार संजय दौंड, आदी नेते आणि प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.
राजकीय परिस्थितीशी जुळवून घ्या, बहीण भावाला अप्रत्यक्ष संदेश
महायुतीचं सरकार आल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे प्रथमच एका मंचावर (राजकीय/ प्रशासकीय) आले होते. त्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचं लक्ष त्यांच्याकडे लागलं होतं. विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल अशी कुणकुण लागली तेव्हापासूनच दोघा बहीण भावांनी एकमेकांविरोधातील तलवारी म्यान करून बदललेल्या राजकीय परिस्थितीशी अनुरूप एकमेकांशी जुळवून घेण्याचं धोरण ठरवलं. त्याचाच परिपाक म्हणजे तब्बल एका तपानंतर मुंडे बहीण भावांनी एकत्र रक्षाबंधन साजरं केलं. यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकांकडेही राज्याचं लक्ष होतं.
आज बीडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांनीही तडफदार भाषणं केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही ‘पंकजाताई आणि धनुभाऊ सोबत राहा.. जिल्ह्याचा विकास करा, तुम्हाला एकत्र आलेलं जनतेला पाहायचंय’ अशी इच्छा बोलून दाखवत पुढील राजकीय परिस्थितीशी जुळवून घ्या असंच दोघांना अप्रत्यक्षपणे सांगितलं.
आमच्यातला संघर्ष संपला!
कार्यक्रम संपल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी धनुभाऊंना गाठून पंकजाताईंबरोबर मंच शेअर केल्याने त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांना एक्सक्लुझिव्ह बातमीच दिली. ते म्हणाले, आमच्यात राजकीय मतभेद होते, मनभेद कधीच नव्हते. महायुती सरकारमध्ये आल्यानंतर आमच्यात जो राजकीय संघर्ष होता तो संपला. राजकारणात त्या वेळी आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, विचारांनी वेगळे होतो. आता महायुतीच्या माध्यमातून हे सर्व विचार एकत्र आल्यानंतर आमच्या बहीण-भावामध्ये अंतर पडायचं कारण नाही”.
“आम्ही याआधीही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो. पण ज्या मजबुतीने जिल्ह्याचं नेतृत्व व्यासपीठावर आज पाहायला मिळालं, त्याचा आनंद सगळ्यांनाच होता, व्यासपीठावर जिल्ह्याचं नेतृत्व एकत्र आल्याचा आनंद पंकजा ताईंनाही होता व मलाही होता. या पंचक्रोशीतल्या अनेकांना असं वाटतं की आम्ही दोघांनी आधी जसं एकत्र काम करत होतो, तसंच एकत्र काम करावं”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
त्याचवेळी पंकजा मुंडे लोकसभेवर जाणार की नाही याबाबत थोडासा संयम पाळा, माध्यमांनी थोडा सस्पेन्स ठेवा. आताच सगळं कशाला सांगू, असं सूचक विधान धनंजय मुंडे यांनी केलं.