जळगावात काल रविवारी रात्री सभा घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जामनेरात रोड शो, त्यानंतर बोदवड व भुसावळात मराठा समाज बांधवांच्य गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर दुपारी मुक्ताईनगर शहरात जरांगे पाटील यांची मोठी जाहिर सभा झाली. जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत त्यांचे मुक्ताईनगरातील सकल मराठा समाजाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण नसल्याने मराठ्यांचर पोरं आत्महत्या करायला लागली आहेत. आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आता आरक्षण नसलेल्यांच्या मदतीला यावे म्हणून तुमच्या दारात आलो आहे. खान्देश व विदर्भातील मराठ्यांनी मराठवाड्यातील मराठा बांधवांच्या पाठीशी उभे रहावे. हीच वेळ आहे. आम्ही ८० टक्के लढाई जिंकली आहे. राज्यात ३२ लाख जणांना आरक्षण मिळाले. जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे मराठे आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आपल्या लेकरांसाठी कोणत्याही टोकाला जायला मराठे तयार आहे. आता मराठा कुणावरही विश्वास ठेवणार नाही राजकरण्यांवर तर नाहीच त्यांनीच आमची वाट लावल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
‘तो येवल्याचा’ जातीयवाद करतो
आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. ‘तो येवल्याचा’ जातीयवाद करतो. त्याचे ऐकून जातीयवाद व दंगली करु नका. मराठ्यांनी ओबीसींवर व ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर जावू नये. खान्देश व विदर्भातील मराठा मराठवाड्यातील मराठ्यांच्या मागे उभे राहिल्यास तुमचे उपकार विसरणार नाही. तुमच्या पाठबळाच्या जीवावर आम्ही तिथे जीवाची बाजी लावतो आहे. तुमच्या बांधवाची लेकरे तुम्हाला विनंती करीत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे रहा, अश्या शब्दात जरांगे पाटील यांनी खान्देशातील मराठ्यांना भावनिक साद घातली. २४ डिसेंबरला आरक्षण न दिल्यास मराठा खेटायला तयार आहे. लेकरांसाठी कुठल्याही टोकाला जाण्याची तयारी असल्याचा इशारा देखील जरांगे पाटील यांनी सरकारला यावेळी दिला.