• Sat. Sep 21st, 2024

पर्यावरण केंद्राला घरघर; पुणे महापालिकेने निधी थांबवला, ‘इंद्रधनुष्य’ केंद्र बंद करण्याच्या चर्चेला ऊत

पर्यावरण केंद्राला घरघर; पुणे महापालिकेने निधी थांबवला, ‘इंद्रधनुष्य’ केंद्र बंद करण्याच्या चर्चेला ऊत

पुणे : पर्यावरण संवर्धन जनजागृती आणि या क्षेत्रात कार्यरत संस्था, नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रा’चा देखभाल निधी महापालिकेने सहा महिन्यांपासून थांबवला आहे. वित्तीय समितीने देखभाल खर्चाची निविदा मंजूर केली नसल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम थांबवले असून, केंद्राची दुरवस्था झाली आहे. दिवाळीनंतर कार्यक्रमांची नोंदणीही बंद झाली असून, महापालिका केंद्र बंद करण्याची शक्यता असल्याचे पर्यावरणप्रेमी संस्थांना वाटत आहे.

पालिकेची सोयीस्कर भूमिका

म्हात्रे पुलाजवळ, राजेंद्रनगर परिसरात महापालिकेचे ‘इंद्रधनुष्य पर्यावरण आणि नागरिक सुविधा केंद्र’ दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. या केंद्रामध्ये प्रशासन आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांतर्फे वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात. या इमारतीचे बांधकाम पर्यावरणस्नेही पद्धतीने केले असून, नैसर्गिक प्रकाशाचा विचार करून सभागृह आणि इतर खोल्यांची रचना करण्यात आली आहे. पालिकेतर्फे केंद्राचा देखभाल खर्च केला जातो. मात्र, गेल्या वर्षापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केंद्राकडे दुर्लक्ष केले आहे. या केंद्राची विशिष्ट विभागाकडे थेट जबाबदारी नसल्याने संबंधित अधिकारी सोयीस्कर भूमिका घेत आहेत.

केंद्राचे आवार अस्वच्छ; गवत वाढले

गेल्या काही वर्षांत केंद्राची रंगरंगोटी झालेली नाही. उद्घाटन झाल्यापासून तेथील ‘सोव्हेनिअर शॉप’, किचन बंदच आहे. दर वर्षी निविदेद्वारे केंद्राचे व्यवस्थापन, स्वच्छतेची जबाबदारी सांभाळली जाते. निविदा नूतनीकरणासाठी पर्यावरण विभागाने जूनमध्ये वित्तीय समितीकडे प्रस्ताव दिला होता. मात्र समितीने ती फेटाळली. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले. निविदेचे नूतनीकरण होईल, या आशेने त्यांनी काही दिवस स्वच्छता केली. मात्र, दिवाळी उलटली तरी काहीही प्रगती झालेली नाही. केंद्राचे आवार अस्वच्छ असून, मागील बाजूस गवत वाढले आहे. राडारोडाही पडला आहे. सध्या संस्थेमध्ये विविध संस्थांमार्फत आयोजित कार्यक्रमही थांबविण्यात आले आहेत. काम कधी सुरू होणार, याविषयी स्वच्छता कर्मचारीही अनभिज्ञ आहेत.

पर्यावरण केंद्राला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेने साकारलेल्या या ‘इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रा’ला गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने पुरस्कार देऊन गौरविले. लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी बांधलेली इमारत, सार्वजनिक स्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.

निसर्ग, वन्यजीवन, पर्यावरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. स्वयंसेवी संस्थांना खासगी सभागृहांमध्ये शुल्क भरून उपक्रम राबविणे परवडत नाही. महापालिकेने खास पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आमच्यासारख्या संस्थांचा चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा चांगला उपयोगही होत आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून कार्यक्रमांची नोंदणी थांबविल्याने आम्ही संभ्रमात पडलो आहोत.- शेखर नानजकर, वाइल्ड संस्था

इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र पर्यावरण अभ्यासक, मार्गदर्शक आणि पर्यावरण प्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. या सभागृहात विविध स्वयंसेवी संस्था वर्षभर कार्यशाळा, चर्चासत्र, तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करतात. त्याला पर्यावरणप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळतो. लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक व्याख्यानमाला ऐकण्यासाठी येतात. अशा प्रकारचे पर्यावरण शिक्षण, प्रसारासाठी राखीव केंद्र उभारणारी पुणे महापालिका एकमेवच असेल. हा कौतुकास्पद उपक्रम यापुढेही सुरू राहिला पाहिजे.- राजीव पंडित, जीविधा संस्था
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला गेला नाहीत तर परीक्षेला बसू देणार नाही, विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचा आरोप
इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्राच्या कल्पना मांडण्यापासून ते पूर्णत्वाला येईपर्यंतचा प्रवासाची मी साक्षीदार आहे. उल्लेखनीय आणि सर्वस्तरावर प्रशंसनीय उपक्रमांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर कौतुक झाले. मात्र, महापालिकेने केंद्राची देखभाल केलेली नाही. रंगरंगोटी झालेली नाही. स्वच्छतेबाबत टाळाटाळ होते आहे. आता या केंद्राचा निधी रोखला जात असेल, तर खेदजनक आहे. मी याबाबत पाठपुरावा करणार आहे.- अॅड. वंदना चव्हाण, खासदार

इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्राबाबत कोणतीही समस्या नाही. निविदा फेटाळल्याची माहिती चुकीची आहे. आम्ही निधी रोखलेला नाही. उलट ते अधिक चांगल्या रूपात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.- माधव जगताप, उपायुक्त, पुणे महापालिका

केंद्राचा उद्देश काय?

– समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण करणे.
– पर्यावरण संकल्पनेवर आधारित केंद्राची रचना आहे.
-यामध्ये थ्रीडी प्रदर्शने, पॅनल्स, माहिती फलकांचा वापर केला आहे.
– पर्यावरण, निसर्ग, विज्ञानाशी संबंधित स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या उपक्रमांसाठी संस्थेतील सभागृह मोफत दिले जाते.
– सभागृहात प्रोजेक्टरची सुविधा असून, त्यावर पर्यावरणविषयक चित्रपट, माहितीपट सादर केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed