मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग हा पुणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावर काल रात्रीपासून अवजड वाहने असल्याचे वाहतूक कासव गतीने सुरू होती. महामार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडीमुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलीस दहा दहा मिनिटांच्या ब्लॉक घेऊन पुण्याकडे येणारी वाहतूक दोन्ही मार्गांवरून सोडत आहेत. तसेच पुढील काही वेळात ही वाहतूक कोंडी सुटेल अशी पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
महामार्गावरील वाहतूककोंडीबाबत सुळेंचे ट्विट
याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वाहतूक कोंडी बाबत व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे वरुन मुंबई ते पुणे प्रवास करीत असताना घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. यापुर्वी हा रस्ता प्रवासासाठी अतिशय उत्तम असा होता. परंतु अलिकडे या रस्त्याने प्रवास करताना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यात वेळ, पेट्रोल-डिझेल वाया तर जातेच याशिवाय पर्यावरणाचेही नुकसान होते. राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालून प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा, अशी विनंती देखील सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली आहे. त्याच आज पुन्हा वाहतूक कोंडी झाल्याने प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News