रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेत प्रवासादरम्यान प्रवेश करण्यापासून उतरण्यापर्यत मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यातच अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश दिल्यास प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सद्य परिस्थितीत अनधिकृत फेरीवाल्यांच्या तक्रारी रेल्वेकडे प्रवाश्यांनी केलेल्या लक्षणीय आहेत. मात्र प्रवाशांच्या तक्रारींकडे रेल्वेने दुर्लक्ष केलेलं दिसून आलं आहे.त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असताना आता फेरीवाल्यांचा मोठा मनस्ताप निर्माण होणार आहे. त्यामुळे रेल्वेने अनधिकृत फेरीवाल्यांना लोकलमध्ये माल विकण्यास दिलेल्या परवानगीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लोकल वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता होण्याआधीच रेल्वेत फेरीवाल्यांना प्रवेश देऊन रेल्वे प्रवाशांना मनस्ताप देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे रेल्वेने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
राजू पाटील यांनी रेल्वेला लिहिलेलं पत्र
वास्तविक उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवाशांना दररोज तारेवरची कसरत करुन प्रवास करावा लागतो. लोकलमध्ये चढायला, पाय ठेवायलाही जागा नसते, अशी सध्याची परिस्थिती आहे. लोकल पकडताना व प्रवास करताना अनेकांनी जीव गमावलेले आहेत, अशा परिस्थितीत फेरीवाल्यांना जर लोकलमध्ये वस्तु विकायला रेल्वे प्रशासन अधिकृतपणे परवाना देणार असेल तर लोकलमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये संघर्ष वाढून प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे असूनही सद्यस्थितीत मध्ये रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यातून रोज हजारोंच्या संख्येने अनधिकृत पुरुष/महिला फेरीवाले सामान विक्री करत आहेत. याबाबत रेल्वेच्या हेल्पलाईन नंबर तसेच आरपीएफ जीआरपीकडे अनेक तक्रारी येत असताना कर्मचारी मनुष्यबळाची कमतरता म्हणून हतबलता व्यक्त करतात. रेल्वे प्रशासन/आरपीएफ जीआरपी यांच्या सोबत आतापर्यंत या अनधिकृत फेरीवाल्यांवर बंदी आणण्याचे अनुषंगाने लोकप्रतिनिधी रेल्वे संघटना यांनी अनेकदा बैठक घेऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करत आलेली नाही.
उपनगरीय रेल्वेमधील वाहत जाणारी प्रवाशांची संख्या पाहता लोकलची संख्या कमी पडत आहे. महिन्याचा किंवा तीन महिन्याचा अॅडव्हान्स पास काढून देखील रोज चेंगराचेंगरीत प्रवास करावा लागत आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी चुकीचे निर्णय घेऊन प्रवाशांच्या त्रासात वाढ करण्याचे धोरण रेल्वे प्रशासनाने स्विकारले आहे, असे दिसून येते.
लोकल वाढविण्याचे आश्वासने दिली जातात पण अद्यापपर्यंत लोकल वाढलेल्या नाहीत. वेळापत्रक ऑक्टोबरमध्ये बदलणार होते, नोव्हेंबर संपत आला तरी नवीन वेळापत्रक नाही, यावर उपाययोजना करण्याऐवजी अधिकृत फेरीवाले आणून काय साध्य करायचे आहे. आपल्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.