नवी मुंबईतील बेलापूर सीबीडी येथे असलेल्या कोकण विभागीय कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कक्ष क्रमांक-३१५ येथे विभागीय सहायक संचालक, भाषा संचालनालय यांचे कार्यालय आहे. याच इमारतीच्या तळमजल्यावरील कक्ष क्रमांक जी-१६ येथे उप कोषागार (ट्रेझरी) कार्यालय आहे. पावसाळ्यात कोकण भवन इमारतीच्या आवारात व तळमजल्यावर अनेकवेळा पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तळमजल्यावरील अनेक कार्यालयात पाणी शिरून कार्यालयातील कागदपत्रांचे व अन्य सामानांचे नुकसान होते. दरवर्षी हा प्रकार घडत असल्याने तळमजल्यावरील उप कोषागार कार्यालय अन्यत्र हलविण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा विचार सुरू होता. याचा अर्थ भाषा संचालनालयाच्या कार्यालयात पाणी शिरल्यास सरकारला कोणत्याही प्रकारची हरकत नसावी, असाच होत होता.
अखेर कोकण भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या विभागीय भाषा संचालनालयाची १२७६ चौ. फूट जागा उप कोषागार कार्यालयास देण्याचा व तळमजल्यावरील उप कोषागार कार्यालयाच्या एकूण १६०० चौ. फूट क्षेत्रफळापैकी ४०० चौ. फूट क्षेत्रफळाची जागा उप कोषागार कार्यालयासाठी राखीव ठेवून १२०० चौ. फूट क्षेत्रफळ विभागीय भाषा संचालनालयाला देण्याचा निर्णय ७ जानेवारी, २०२१ रोजी सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. याप्रकरणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आवाज उठवल्यानंतर दोन्ही कार्यालयांची परस्पर जागा बदलण्याची कार्यवाही थांबली होती. त्यानंतर या संदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ७ जानेवारी, २०२१ रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करत असल्याचे सर्व संबंधित विभागांना कळविले आहे.
पाणी साचण्याची समस्या कायम
उप कोषागार कार्यालयाचा कारभार वाढल्याने मनुष्यबळातही वाढ झाली आहे. परिणामी, सध्या अस्तित्वात असलेली जागा अपुरी पडत असल्याने व पावसाळ्यात उपकोषागार कार्यालयात पाणी शिरून कम्प्युटर, सर्व्हर तसेच इंटरनेट यंत्रणेत बिघाड होऊ नये म्हणून हे कार्यालय अन्यत्र हलवण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने अडीच वर्षांपूर्वी घेतला होता. उपकोषागार कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या लोकांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणावर असते. त्यात निवृत्तीनिधीसाठी तसेच, विविध दाखल्यांसाठी उपकोषागार कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे. असे असताना उप कोषागार कार्यालय तिसऱ्या मजल्यावर गेल्यास अनेक सेवानिवृत्तांना ही बाब त्रासदायक ठरणारी होती. आता स्थलांतराचा निर्णय मागे घेतला गेला असला तरी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या मात्र कायम राहिली आहे.